दौंड विधानसभेत खा. सुळे यांना बसणार फटका | पुढारी

दौंड विधानसभेत खा. सुळे यांना बसणार फटका

उमेश कुलकर्णी : 

दौंड : राज्याच्या सत्तासंघर्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार व शरद पवार असे दोन गट पडले. दौंड तालुक्यातदेखील हीच परिस्थिती असून, एक गट शदर पवारांकडे, तर दुसरा गट अजित पवारांकडे गेला आहे. याबाबत कार्यकर्त्यांनी आपली भूमिका उघड केली नसून, ते द्विधा मनस्थितीत आहेत, तर भाजपच्या गटात थोडीफार अस्वस्थता पाहण्यास मिळते. मात्र, या बदलत्या समीकरणाचा मोठा फटका दौंड विधानसभेत खा. सुप्रिया सुळे यांना बसण्याची दाट शक्यता आहे.

खा. सुप्रिया सुळे यांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून ज्यांनी काम केले, तेच नेते मात्र आता पक्ष सोडून गेले आहेत. परिणामी, येणार्‍या काळात खासदार सुप्रिया सुळे यांना याची किंमत नक्कीच मोजावी लागेल. मुळातच गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस हा दौंड तालुक्यात खिळखिळा झाला होता. आता यापुढील काळात दौंड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद नक्कीच कमी झालेली असेल यांत तिळमात्र शंका नाही. दौंड तालुक्याचे अध्यक्ष आप्पासाहेब पवार हे मात्र शरद पवार यांच्या गटात असल्याचे सांगत आहेत. खासदार

सुप्रिया सुळे यांना येणार्‍या निवडणुकीमध्ये त्यांचा  किती फायदा होईल हे मात्र आता सांगणे कठीण आहे. दुसरीकडे भाजपचे आमदार राहुल कुल यांच्यापुढे मात्र पेच निर्माण होणार असल्याची चर्चा कार्यकर्ते दबक्या आवाजात करीत आहेत. त्यामुळे येणार्‍या निवडणुका कुल-थोरात एकत्र लढणार का, हा मोठा प्रश्न आहे. अजित पवार यांचे विश्वासू सहकारी रमेश थोरात यांना पवार काय जबाबदारी देतात, हेदेखील पाहणे गरजेचे आहे. आमदार राहुल कुल याबाबतीत वेट अ‍ॅड वॉच भूमिका घेतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे. परंतु येणार्‍या काळात दौंड तालुक्यातील राजकारणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भाजपच्या कार्यकर्त्यांची मात्र या राजकीय सारीपाटात घुसमट होत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे भीमा पाटस कारखान्यावरून आमदार राहुल कुल यांच्यावर माजी आमदार रमेश थोरात यांनी भ—ष्टाचाराचे आरोप केले होते. त्या वेळी कार्यकर्त्यांनी थोरात यांच्याविरोधात रणशिंग फुंकले होते. तेच थोरात आता सहयोगी असल्याने या कार्यकर्त्यांची स्थिती अवघडल्यासारखी झाली आहे.

दौंडकरांचे लाल दिव्याचे स्वप्न अपुरेच राहणार ?
दौंड शहराला अनेक वर्षांपासून लाल दिव्याची प्रतीक्षा आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत बारामती व दौंड यांना दोन मंत्री पदे देणे अशक्यप्राय दिसत आहे. कारण दोन मंत्रिपदे जर लगतच्या तालुक्यातच गेली, तर जिल्ह्यात बाकीच्यांना काय द्यायचे हादेखील कळीचा मुद्दा ठरू शकतो. त्यामुळे या वेळीदेखील दौंडकरांचे लाल दिव्याचे स्वप्न अपुरचे राहते अशी दाट शक्यता राजकीय गोटातून वर्तविण्यात येत आहे.

Back to top button