पावसाळ्यातही टँकरद्वारे पाणीपुरवठा ; पुणे विभागात 117 गावे, 615 वाड्या तहानलेल्या | पुढारी

पावसाळ्यातही टँकरद्वारे पाणीपुरवठा ; पुणे विभागात 117 गावे, 615 वाड्या तहानलेल्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पुणे विभागातील पाच तालुक्यांतील 117 गावे आणि 615 वाड्यांवरील नागरिक आणि जनावरांसाठी 97 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पावसाळ्याच्या दुसर्‍या महिन्यातील पहिला आठवडा संपला असूनही टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. पुणे जिल्ह्यातील 44 गावे आणि 231 वाड्यांतील 78 हजार 209 नागरिकांना 44 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सातारा जिल्ह्यात सर्वाधिक 48 टँकर सुरू असून, 45 गावे आणि 265 वाड्यातील 78 हजार नागरिक आणि 33 हजार 471 जनावरे तहानलेली आहेत.

सांगली जिल्ह्यात 7 टँकरद्वारे 9 गावे आणि 11 वाड्यांतील साडेतीन हजार जनावरे आणि साडेबारा हजार नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. सोलापूर जिल्ह्यात 10 टँकर सुरू असून, त्यात 10 गावे आणि 88 वाड्यातील सुमारे 20 हजार नागरिक आणि 35 हजार जनावरांसाठी पाणीपुरवठा केला जात आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात एकही टँकर सुरू नाही, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली.

1 लाख 88 नागरिकांना पाणीपुरवठा
गेल्या वर्षी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरली होती. तसेच यंदा सातत्याने अवकाळी पाऊस पडत असल्याने यंदा विलंबाने टँकर सुरू करावे लागले. जूनच्या अखेरीस घाटमाथ्यावर चांगला पाऊस झाला. मात्र, जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने अद्यापही पुणे विभागातील एक लाख 88 हजार नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

Back to top button