सत्ता संघर्षाचे पडसाद तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत

File Photo
File Photo

हिंजवडी : राज्यातील सत्तासंघर्षाचे पडसाद आता पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शिवसेना (उद्धव ठाकरे), बाळासाहेबांची शिवसेना, राष्ट्रवादीसह भाजप पक्षातील तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचत आहे. आपण काम करत असलेल्या पक्षात आणि पक्षाची विचारधारा काय? पक्षाची भूमिका काय? याचे दूरगामी परिणाम काय ? याची चर्चा सध्या ग्रामीण भागात होत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वेगळी भूमिका घेत थेट सत्तेत सामील होण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे भाजप तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही संभ्रमावस्थेत असल्याची भावना आहे. त्यामुळे आगामी निवडणुका होत असतानाच कोणत्या उमेदवारांचे काम करावे असा सवाल कार्यकर्त्यांना पडला आहे.

कार्यकर्ता मात्र निराश
जिल्ह्यात तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा क्रमांक एकचा विरोधक भाजप आहे. भाजचे अनेक कार्यकर्ते वर्षांनुवर्षे राष्ट्रवादीच्या विरोधात काम करतात. त्यामुळे विविध महत्वाचे असलेले पाच प्रश्न विचारात घेत कार्यकर्त्यांना आणि पक्षाला पक्षाची ताकद कशी वाढणार, कार्यकर्त्यांना बळ मिळणार का?, कार्यकर्त्यांचे संघटनेतील महत्त्व काय? जिल्ह्यातून निवडून आलेल्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान नाही त्यामुळे त्यांच्यावरदेखील अन्याय केला जात आहे. त्यामुळे कार्यकर्ता मात्र पूर्णपणे निराश झाल्याचे दिसत आहे.

मुळशीत कार्यकर्त्यांचा कल कुणाकडे याकडे लक्ष

मागील दोन दिवसांत घडत असलेल्या घडामोडींचा मुळशी तालुक्यातील तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत परिणाम होत आहे. आजपर्यंत ज्या पक्षाच्या आणि विचारधारेच्या विरोधात काम केले त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसायचे का? असा सवाल कार्यकर्ते उपस्थित करू लागले आहेत. मुळशीत प्रामुख्याने अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे पंचायत समिती, जिल्हा परिषदेत मोठे यश मिळत आहे. लोकसभा निवडणुकीतदेखील मोठ्या प्रमाणात खासदार सुप्रिया सुळे यांना मताधिक्य मिळत असते. पक्षाच्या माध्यमातून जिल्हा बँकेचे उपाध्यक्षपद, यापूर्वी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अशी अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्यकर्त्यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे मुळशीत कार्यकर्त्यांचा कल कुणाकडे याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. परंतु, थेट बोलण्यास अनेक कार्यकर्ते तयार नाहीत. त्यामुळे येणार्‍या काळातच कार्यकर्ते नेणके कोणत्या गटात जाणार हे स्पष्ट होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news