धरणसाखळी क्षेत्रात पावसाचा लपंडाव ; खडकवासला साखळीत 20.76 टक्के पाणीसाठा | पुढारी

धरणसाखळी क्षेत्रात पावसाचा लपंडाव ; खडकवासला साखळीत 20.76 टक्के पाणीसाठा

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा :  पुणे शहर व जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला धरण साखळीच्या पाणलोटक्षेत्रात दोन दिवसांपासून पावसाचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे धरणसाठ्यात संथगतीने होत असलेली वाढ थांबली आहे. मंगळवारी (दि. 3) सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पानशेत व टेमघर येथे 2 व वरसगाव येथे अवघ्या 1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. खडकवासलात पावसाची नोंद झाली नाही. मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला धरणसाखळीत 6.05 टीएमसी म्हणजे 20.76 टक्के पाणीसाठा होता. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात पाणी वाटपाचे नियोजन करावे लागणार असल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले.

पानशेत-वरसगाव धरणखोर्‍यासह सिंहगड, मुठा भागात मंगळवारी दिवसभराच्या उघडिपीनंतर सायंकाळी पावसाची रिमझिम सुरू झाली. दाट ढग जमा झाल्याने चांगल्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

दोन टीएमसी वाढ
पानशेत खोर्‍यात चांगला पाऊस पडल्याने आठवडाभरात धरणसाखळीत जवळपास दोन टीएमसी पाण्याची भर पडली. गेल्या सोमवारी (26 जून) धरणसाखळीत 4.17 टीएमसी म्हणजे 14.31 टक्के पाणीसाठा होता. रायगड जिल्ह्यालगतच्या पट्ट्यातही पावसाचे प्रमाण कमी झाल्याने ओढे-नाले नद्यांतून पाण्याचे प्रवाह मंदगतीने सुरू आहेत.

मंगळवारअखेर पानशेतमध्ये 20.48, वरसगाव 20.84, टेमघर 8.31 तर खडकवासला धरणात 45.07 टक्के पाणीसाठा झाला होता. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाण्याची आवक मंदावली आहे. गेल्या वर्षी 3 जुलै रोजी धरणसाखळीत 2.67 टीएमसी म्हणजे 9.16 टक्के पाणीसाठा होता. गेल्या वर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून अखेरपर्यंत धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळला. यंदा जुलै सुरू होऊनही अद्याप पावसाने जोर धरलेला नाही. वारे वाहत असल्याने पावसाचे ढग विरळ होत आहेत. त्यामुळे केवळ रिमझिम सुरू आहे.

Back to top button