सांगवी : पुढारी वृत्तसेवा : दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे पवार चुलते व पुतण्यात भविष्यात राजकीय संघर्ष होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मराजकीय संघर्ष वगैरे काही नाही. पवार हे शेवटी आतून एकच असून, ते कसे फुटतील? असा निशाणा खा. शरद पवार यांचे वर्गमित्र व सध्या त्यांचे विरोधक असलेले माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे यांनी लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय जीवनात सुरुवातीपासूनच चंद्रराव तावरे यांनी खांद्याला खांदा लावून साथ दिली होती. त्यानंतर सहकार क्षेत्रात त्यांनी अग्रेसर भूमिका घेऊन माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न केला होता. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या विरोधात कायम भूमिका ठेवून सहकार वाचविण्यासाठी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. गेल्या 25 वर्षांपासून पवार कुटुंबीयांशी काडीमोड करून सहकार वाचविण्यासाठी तसेच प्रदूषित होत असलेली निरा नदी प्रदूषणमुक्त होण्यासाठी तावरे यांनी पुढाकार घेतला आहे.
चंद्रराव तावरे म्हणाले, त्यांनी कोण कुठल्याही पक्षात जाऊ शकते, यात गैर काय आहे? राष्ट्रवादीत फूट वगैरे काही नाही. राजकारणात पवार कुटुंबीय आतून एकच आहे. मोदींच्या कार्याला अजित पवार यांनी मदत करावी, असा सल्ला दिला.