Ajit pawar : बारामतीत अजित पवारांचाच शब्द अंतिम

Ajit pawar : बारामतीत अजित पवारांचाच शब्द अंतिम
Published on
Updated on

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीतील फुटीमुळे खळबळ उडालेली असली, तरी बारामतीच्या राजकारणात अजित पवार यांचा शब्दच अंतिम असल्याचे सिद्ध झाले आहे. सोमवारी (दि. 3) बारामती तालुका सहकारी दूध संघाच्या पदाधिकारी निवडीत परंपरेप्रमाणे अध्यक्ष-उपाध्यक्षांची नावे अजित पवार यांच्याकडूनच कळविण्यात आली. तालुक्यातील सर्वच सहकारी संस्थांवर अजित पवार यांची एकहाती पकड आहे. दूध संघाच्या पदाधिकारी निवडीतून ते स्पष्ट झाले.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचा त्यांच्या कृतीला पाठिंबा नसल्याचे जाहीर केले. अजित पवार यांना अपात्र ठरवावे असे पत्र विधानसभा अध्यक्षांना दिले, परंतु बारामती तालुक्यातील राष्ट्रवादी अजित पवार यांच्याच ताब्यात असल्याचे दिसून येत आहे.

सोमवारी येथील बारामती तालुका सहकारी दूध संघाच्या पदाधिकार्‍यांची निवड पार पडली. त्यासाठी पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्याकडे अजित पवार यांनी अध्यक्ष, उपाध्यक्षांची नावे पाठवली होती. एकीकडे सरकारमध्ये सहभागी होणार्‍यांना अपात्र करा, अशी मागणी शरद पवार यांच्या वतीने जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली असताना बारामतीत अजित पवार यांच्या सूचनेवरून पदाधिकारी निवडले गेल्याने त्यांचा शब्द अंतिम असल्याचे दिसून आले.

रविवारी (दि. 2) अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर बारामतीतील बहुतांश सर्वच सहकारी संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी रातोरात मुंबई गाठत पवार यांचे अभिनंदन केले. बारामतीतून अलिशान वाहनांचे ताफेच्या ताफे मुंबईच्या दिशेने रवाना झाले. पवारांना पुष्पगुच्छ देताच अनेकांनी आपल्या स्टेटसवर त्याचे फोटो प्रसिद्ध केले. राष्ट्रवादीत उभी फूट पडली असताना येथील पक्षाचे पदाधिकारी अथवा सहकारी संस्थांचे पदाधिकारी मात्र अजित पवार यांच्याच बाजूने असल्याचे दिसून येत आहे.

शरद पवार यांच्या समर्थनार्थ अद्याप तरी कोणीही पुढे आलेले नाही. सामान्य जनतेच्या प्रतिक्रियेत मात्र आम्ही शरद पवार यांच्यासोबत असल्याचे सांगितले जात आहे. अजित पवार यांनी गेल्या तीस वर्षांच्या कालावधीत अनेक कार्यकर्त्यांना पदे दिली. अनेक ठेकेदारांना कोट्यवधी रुपयांची कामे मिळवून दिली. अजित पवार सत्तेत नसतानाही या ठेकेदारांचे फारसे काही बिघडले नाही.

पवार यांच्या शब्दावर त्यांची कामे सुरूच राहिली. सहकारी संस्थांसह अन्य निवडणुकीतून शरद पवार यांनी लक्ष काढून घेतले होते. त्याचे सर्वाधिकारी अजित पवार यांच्याकडेच होते. त्यामुळे अजित पवार यांचेच तालुक्यात प्राबल्य निर्माण झाले. आजच्या घडीला तरी शरद पवार यांच्या बाजूला पक्षाचे अथवा सहकारी संस्थांचे कोणीही पदाधिकारी नसल्याचे दिसून येत आहे. अजित पवारांना भेटण्यासाठी गर्दी करणार्‍या बारामतीकरांनी शरद पवार यांना भेटण्याची तसदीही घेतलेली नाही.

बॅनरबाजीला ऊत, शरद पवारांचा फोटो गायब

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर बारामतीत बॅनरबाजी जोरात सुरू आहे. विशेष म्हणजे बहुतांश बॅनरवरून शरद पवार यांचा फोटो गायब आहे. काहींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे फोटो वापरून बॅनर उभे केले आहेत. त्यावर फडणवीस यांचा चाणक्य असा उल्लेख करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनरवर खुद्द पक्षाच्या संस्थापक अध्यक्षांनाच स्थान न दिल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news