पुणे, कोकणाला जोडणारा रस्ता ३ महिने बंद; रायगड प्रशासनाचा मोठा निर्णय

पुणे, कोकणाला जोडणारा रस्ता ३ महिने बंद; रायगड प्रशासनाचा मोठा निर्णय

भोर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पंढरपूर-महाड राज्य महामार्ग हद्दीतील वरंध घाटामध्ये अतिवृष्टीमुळे घाटात दरड कोसळण्याची दाट शक्यता आहे. परिणामी, रायगड जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने शनिवार, दि. 1 जुलैपासून सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. त्यानुसार वाहनचालकांनी आदेशाचे पालन करावे, असे आवाहन महाड पोलिसांकडून करण्यात आले आहे. परंतु भोर प्रशासनाकडून याबाबत काहीही सांगण्यात आले नाही. त्यामुळे भोरमार्गे जाणार्‍या वाहनांची आता मोठी अडचण होणार आहे.

भोर-महाड मार्गावरील वरंध घाटात पावसाळा असल्याने अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्याची शक्यता आहे. या कारणास्तव रायगड-अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हा महामार्ग शनिवार, दि. 1 जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंत अवजड वाहनांना बंद करण्याबाबतचा आदेश देण्यात आला आहे. तसेच याबाबतचे पत्र रायगड जिल्हा वाहतूक शाखा सहायक पोलिस निरीक्षक यांनी महाड एमआयडीसी पोलिस ठाण्याला दिले आहे. त्यानुसार रायगड हद्दीतील हा महामार्ग पुढील 3 महिने अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

कोकणात जाणार्‍या वाहनचालकांची मोठी गैरसोय

या महामार्ग अवजड वाहतुकी बंद होत असल्याने अवजड वाहने ही कोणत्या पर्यायी मार्गाने वळविण्यात येईल, याबाबत पडताळणी करून महाड एमआयडीसी पोलिस ठाण्याकडून अभिप्राय जिल्हा वाहतूक शाखेकडून मागविण्यात आला आहे. महाड एमआयडीसी पोलिसांकडून घाट बंद असल्याचा फलक महाडमधील राजेवाडी येथील भोर फाट्यावर लावण्यात आला आहे. परंतु भोर प्रशासनाकडून याबाबत काही हालचाली केल्या नसून, भोर मार्गावरून कोकणात जाणार्‍या वाहनचालकांची मोठी गैरसोय होणार आहे.

एसटी बससेवाही बंद होणार ?

गेल्या वर्षी भोर व महाड प्रशासनाकडून हा महामार्ग पावसाळ्यात बंद ठेवण्यात आला होता. भोर हद्दीत डांबरीकरण झाल्याने हा महामार्ग चांगला आहे. त्यामुळे यावर्षी पावसाळ्यात रस्ता चालू राहील असे वाटत होते. परंतु रायगड प्रशासनाकडून सर्व अवजड वाहनांना बंदी केल्याने कोकणात जाणार्‍या महामंडळाच्या एसटी बस बंद होणार आहेत. त्यामुळे यंदाही पावसाळ्यात प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. दरम्यान, भोरच्या वारवंड हद्दीत झाड पडले होते, तर काही ठिकाणी किरकोळ माती पडल्याची घटना सोडली तर रस्ता अजून तरी सुस्थितीत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news