पुणे जिल्ह्यात कार्यकर्ते झालेत हतबल

पुणे जिल्ह्यात कार्यकर्ते झालेत हतबल
Published on
Updated on

सुहास जगताप

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी अजित पवार यांच्या बंडाला साथ दिल्यामुळे जिल्ह्यामध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. अजित पवार यांनी बंड केले, तरी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लढाईची घोषणा केल्याने पवार काका-पुतण्यांच्या या लढाईत स्थानिक नेते, कार्यकर्ते सैरभैर झाल्याचे चित्र संपूर्ण जिल्ह्यात दिसत आहेत. अजित पवार हे शरद पवार यांच्याविरोधात जातील, याची कल्पनाच करणे स्थानिक नेते, कार्यकर्त्यांना अवघड झाल्याने त्यांना काहीच समजेनासे झाल्याचे चित्र आहे. बारामतीमध्ये तर कार्यकर्ते हतबल झाल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील सर्व संस्थांच्या निवडणुका या अजित पवार यांच्या नेतृत्वात लढल्या गेल्या आहेत. उमेदवारी देण्यापासून ते निवडून आणण्यापर्यंत सर्व अजित पवार पाहत होते. त्यांच्या बरोबरीला वळसे पाटील असत. आता हे दोघेही शरद पवार यांच्यापासून वेगळे झाल्याने काय भूमिका घ्यावी? हे स्थानिक नेते, कार्यकर्त्यांना समजत नाही, अशी स्थिती आहे. अजित पवार यांनी तयार केलेल्या नवीन पिढीचा शरद पवारांशी फारसा कनेक्ट नाही, तर खासदार सुप्रिया सुळे ह्यासुद्धा अजित पवार यांच्यावर स्थानिक राजकारणासाठी अवलंबून असत. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेचा मोठा प्रश्न आहे.

पुणे जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा दूध संघ, बारामती दूध संघ, अशा सर्वच संस्थांत तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, साखर कारखाने, इतर सहकारी सोसायट्या ते गावपातळीपर्यंत पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे जाळे आहे. येथे काम करणार्‍या कार्यकर्त्यांची मोठी अडचण झाली आहे. पुणे जिल्हा हाच खरा पवार घराण्याचा बालेकिल्ला. परंतु, आता या बालेकिल्ल्यातील युवराजच शत्रूच्या गोटात गेल्याने हा बालेकिल्ला आता कोणत्या पवारांच्या ताब्यात राहणार? याचा निकाल राज्य, राष्ट्रीय पातळीवरील या राजकीय युद्धाचे मुख्य रणांगण ठरणार असलेल्या पुणे जिल्ह्यात होणार असल्याची कल्पना असलेले स्थानिक नेते, कार्यकर्ते सध्यातरी सावध भूमिकेत आहेत.

सर्वच आमदार दादांबरोबर

जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्वच आमदार सध्यातरी अजित पवार यांच्याबरोबर आहेत.
आंबेगाव-शिरूरचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी तर मंत्रिपदाची शपथही घेतली आहे. जुन्नरचे अतुल बेनके, खेड-आळंदीचे दिलीप मोहिते पाटील, इंदापूरचे दत्तात्रय भरणे, मावळचे सुनील शेळके, शिरूरचे अशोक पवार या सर्व आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच आमदारांचा पाठिंबा मिळविण्यात सध्यातरी अजित पवार यशस्वी ठरले आहेत. अजित पवार यांनी बंड केल्यास जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्व आमदार त्यांच्या पाठीशी राहतील, अशी अटकळ प्रथमपासूनच व्यक्त करण्यात येत होती, नेमके तसेच घडले आहे.

रोहित पवार अजित पवारांची जागा घेणार का?

अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवारांचे दुसरे पुतणे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांना त्यांनी आपल्या शेजारी बसविले होते. त्यामुळे आता अजित पवार यांची जागा रोहित पवार घेणार का? यावरही चर्चा सुरू

आता शिवतारेंसाठी कंबर कसावी लागणार

पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघात गेल्या वेळी शिवसेनेचे विजय शिवतारे यांना पराभूत करण्यासाठी अजित पवार यांनी आव्हान देऊन मोठी ताकद लावली होती. त्याच शिवतारे यांना आता या आघाडीमुळे आगामी निवडणुकीत विजयी करण्यासाठी अजित पवार यांना कंबर कसावी लागणार आहे. विजय शिवतारे हे लोकसभेलाही इच्छुक आहेत ते किंवा इतर कोणीही भाजप तर्फे उभे राहणार्‍या उमेदवाराचा आपली बहीण आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात प्रचार करतानाही अजित पवार यांची कसोटी लागणार आहे.

शरद पवारांची भूमिका महत्त्वाची

पुणे जिल्ह्याच्या राजकारणात शरद पवारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. शरद पवार यांनी या बंडाला आपला अजिबात पाठिंबा नाही, असे जाहीर केल्याने जिल्ह्यात आगामी काळात छोटे पवार विरुद्ध मोठे पवार, असा संघर्ष झाला तर स्थानिक नेते, कार्यकर्ते यांची मोठी ससेहोलपट पाहायला मिळेल की काय, अशी स्थिती सध्या आहे. शरद पवार हे यावर कशी मात करतात, हे पाहावे लागेल. लोकसभा निवडणुकीतील सुप्रिया सुळे यांचा विजयी अजित पवार यांच्या भूमिकेवर अवलंबून असेल. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखी एखादी फूट पडेल का काय, असाही राजकीय सूर आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी यासंदर्भात निर्णय होईल, असा अंदाज आहे.

इंदापुरात मजेदार राजकारण रंगणार

या घडामोडीमुळे आगामी विधानसभा निवडणुकीतील भाजपसोबतच्या आघाडीमुळे अनेक मतदारसंघांत मोठी विचित्र राजकीय स्थिती तयार झाली आहे. इंदापूर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आणि माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले पक्षाचे बलाढ्य नेते हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीवरून मोठा संघर्ष होऊ शकतो. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळीही अशाच तिकीट वाटपाच्या संघर्षातून हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. आता आगामी निवडणुकीत तीच स्थिती त्यांच्यासमोर उभी राहिली आहे. तसेच, पालकमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे येणार असल्याने भरणे यांना मतदारसंघात मोठी ताकद मिळणार, हे नक्की आहे. राज्यात, केंद्रात आपले सरकार असल्याने विकास निधी आपणच आणत आहोत, हा दावा आता हर्षवर्धन पाटील यांना करता येणार नसल्याने त्यांची मोठी अडचण होणार आहे. यावर भाजप नेतृत्व काय तोडगा काढते, हे पाहावे लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news