पुणे : मुसळधार पावसामुळे वडिवळे पूल गेला वाहून | पुढारी

पुणे : मुसळधार पावसामुळे वडिवळे पूल गेला वाहून

कामशेत : परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी (दि. 30) सकाळी वडिवळे पूल वाहून गेला आहे. त्यामुळे सात गावांचा कामशेत शहराशी असलेला संपर्क तुटला आहे.

नवीन पुलाचे काम अर्धवट
सध्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे पूल वाहून गेला आहे. त्यामुळे सांगिसे, वळख, वडिवळे, बुधवडी, नेसावे, खांडशी, वेल्लोळी गावांचा संपर्क तुटला आहे. या ठिकाणी दोन महिन्यांपासून नवीन पुलाचे काम सुरू आहे. ते काम अपूर्ण असल्यामुळे जुन्या पुलावर बांध घातला होता. पावसाचा जोर वाढल्याने पाणी वाढले आणि तो बांध फुटल्यामुळे पूल वाहून गेला आहे. त्यामुळे सात गावांतील नागरिकांचा कामशेत शहराशी जनसंपर्क तुटला आहे.

नवीन पुलाचे काम सुरू करण्यास उशीर झाला आहे. जर त्याचे काम लवकर सुरू केले असते तर नागरिकांना त्रास सहन करावा लागला नसता. शासनाच्या दिरंगाईमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
                                                                                    – नागरिक

उपअभियंता येथील पाहणी करण्यासाठी येणार आहे. त्यानंतर मुंढावरेमार्गे जाण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी तो रस्ता तात्पुरत्या स्वरूपात बनवण्यात येणार आहे
                                      – धनराज पाटील, तालुका अधिकारी, बांधकाम विभाग

पर्यायी रस्ता नसल्यामुळे नागरिकांची अडचण

पूल नसल्यामुळे ये-जा करण्यासाठी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करणे अवघड झाले आहे. पर्यायी रस्ता जवळचा नसल्यामुळे नागरिकांची मोठी अडचण झाली आहे. यामध्ये दूध विक्रेते, कामगार, शिक्षक, विद्यार्थी व शेतकरी यांचा कामशेत शहराशी असणारा संबंध पूर्णपणे तुटला आहे. नवीन पुलाचे काम पूर्ण होण्यास चार महिने लागणार आहे. तोपर्यंत नागरिकांनी करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील नागरिकांनी पर्यायी रस्त्याची मागणी केली आहे. मुंढावरे मार्गे जाणारा रस्ता अतिशय खराब असल्याने पावसाळ्यात या रस्त्यातून प्रवास करणे अवघड झाले आहे.

Back to top button