देशात तब्बल सहा हजार कोटींची दूध पावडर पडून | पुढारी

देशात तब्बल सहा हजार कोटींची दूध पावडर पडून

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जागतिक बाजारपेठेत दूध पावडरच्या खरेदीस चीनने हात आखडता घेतला असून, भारतीय पावडरला मागणी कमी झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून गेल्या महिनाभरात देशांतर्गत बाजारात दूध पावडर आणि बटरचे दर प्रति किलोस 50 ते 60 रुपयांनी घटले आहेत. सद्यस्थितीत देशात दूध पावडर आणि बटरचा सुमारे सहा हजार कोटी रुपयांचा साठा पडून असल्याचे सांगण्यात आले. याचा एकत्रित परिणाम दुधाचे दर कमी होण्यावर झाल्याचे सांगण्यात आले.

जागतिक बाजारातील दरावर दूध पावडर आणि बटरचे दर अवलंबून राहतात. चीनने खरेदी बंद केलेली आहे. अन्य देशांतूनही भारतीय पावडरला मागणी कमी झालेली आहे. त्यामुळे जागतिक बाजारात दरात घट होऊन प्रति किलोस दूध पावडरचे दर किलोस 220 रुपये आणि बटरचे दर 340 ते 350 रुपयांवर स्थिरावले आहेत. जागतिक बाजारपेठेचा थेट परिणाम देशातील बाजारपेठेवरही दिसून आला आहे. सद्यस्थितीत देशात सहकारी व खासगी दूध डेअर्‍यांकडे मिळून सुमारे एक लाख टनाइतका दूध पावडरचा साठा असून, बटरचा 35 ते 40 हजार टन साठा आहे.

त्यापैकी महाराष्ट्रात अनुक्रमे 35 हजार टन व 18 ते 20 हजार टनाइतका साठा शिल्लक असल्याची माहिती पावडर उत्पादकांकडून देण्यात आली. आजमितीस देशात सुमारे सहा हजार कोटींचा पावडर व बटरचा साठा पडून असून, मागणी तुलनेने कमी आहे. त्यामुळे दूध पावडरचे दर प्रतिकिलोस 310 ते 320 रुपयांवरुन घटून 250 ते 270 रुपये तर बटरचे भाव किलोस 410 ते 430 रुपयांवरुन कमी होत 350 ते 375 रुपयांपर्यंत खाली आल्याची माहिती दुग्ध वर्तुळातून देण्यात आली.

शासनाने घोषित केलेला दूध दर देण्याचे आव्हान

दूधाचे दर हे सर्वस्वी दूध पावडर आणि बटरच्या दरावर अवलंबून आहेत. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्याचे सूत्र, जागतिक बाजारातील दर यानुसार त्याचा थेट परिणाम दूधाच्या खरेदी दरावर होत आहे. दूध उद्योगात खासगी डेअर्‍यांचा वाटा मोठा असून, पावडर व बटर उत्पादनात त्या आघाडीवर आहेत. दुधाच्या पाऊच पॅकिंगमधील विक्रेत्यांच्या अडचणी त्याहून वेगळ्या आहेत. त्यामुळे शासनाकडून घोषित समितीकडून दुधाचे खरेदी दर लवकरच निश्चित होणार आहेत. त्यानुसार दूध दर देण्याचे आव्हान उद्योगासमोर आहे. ते न दिल्यास शासन काय भूमिका घेणार? याकडे दूध उत्पादक शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

Back to top button