पुणे : पालिकेचा कोट्यवधींचा भूखंड बिल्डरच्या ताब्यात! | पुढारी

पुणे : पालिकेचा कोट्यवधींचा भूखंड बिल्डरच्या ताब्यात!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : खराडी येथील महापालिकेचा जवळपास पाचशे कोटींची किंमत असलेला 15 हजार 779 चौरस मीटरचा आरक्षित भूखंड एका बड्या बांधकाम व्यावसायिकाने परस्परच ताब्यात घेण्याची प्रकिया सुरू केली आहे. ही प्रक्रिया सुरू असताना पालिका प्रशासनाला मात्र याची कल्पनाच नसल्याचेही समोर आले आहे, त्यामुळे हा भूखंड जाणीवपूर्वक बांधकाम व्यावसायिकाच्या घशात घालण्याचे काम तर सुरू नाही ना? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

खराडी सर्व्हे नं. 53 व 54 येथील 15 हजार 779 चौरस मीटरची अ‍ॅमेनिटी स्पेसची जागा महापालिकेच्या ताब्यात आलेली आहे. या भूखंडावर एक्झिबेशन सेंटरचे आरक्षण आहे. याच भागात मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्या उभ्या राहिल्याने या भूखंडाची किंमत आता जवळपास पाचशे कोटींच्या जवळपास आहे. त्यामुळे हा भूखंड घेण्यासाठी शहरातील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाने प्रयत्न सुरू केले आहेत. या भूखंडाच्या बदल्यात संबधित बांधकाम व्यावसायिक पालिकेला अतिक्रमण असलेला भूखंड देऊ पाहत आहे.

राज्याच्या नगरविकास खात्याच्या माध्यमातून पालिका प्रशासनावर त्यासाठी दबाव आणला जात आहे. यासंबधीचा प्रस्ताव पालिका प्रशासनाकडून तयार केला आहे. मात्र, त्यास विरोध झाल्यानंतर त्यावर गेल्या वर्षभरापासून कार्यवाही झालेली नाही. असे असतानाच आता संबधित बांधकाम व्यावसायिकाने या भूखंडावर गेल्या आठवडाभरापासून परस्पर ताबा घेण्याचे काम सुरू केले आहे. या भूखंडावर लोखंडी पत्रे लावून एक केबिन तयार करण्यात आली आहे.

तसेच महापालिकेची भिंत तोडून बांधकाम व्यावसायिकाने आरक्षित भूखंडाला स्वतंत्र भिंत बांधण्याचे काम सुरू केले आहे. तसेच जेसीबी लावून या भूखंडावर काम सुरू आहे. असे असताना महापालिकेला मात्र याची कल्पनाच नाही. महापालिकेच्या संबधित विभागाच्या अधिकार्‍यांकडे याबाबत विचारणा केली असताना त्यांच्याकडून यासंदर्भात चौकशी करू, असे मोघम उत्तर देण्यात आले.

एक्झिबेशन सेंटरवर जे काम सुरू आहे. त्या ठेकेदाराने हे काम महापालिकेचे असल्याचे आम्हाला खोटे सांगितले. वर्क ऑर्डर मागितल्यानंतर एका बांधकाम व्यावसायिकाचे हे काम असल्याचे त्याने सांगितले. याबाबत महापालिकेने खुलासा करून कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन उभारू.

– प्रभा करपे, अध्यक्षा, खराडी वेलफेअर रेसिडेन्शिल वेलफेअर

खराडी रेसिडेन्शिअल वेल्फेअरकडून विरोध

एक्झिबेशन सेंटरचा भूखंड बांधकाम व्यावसायिकाने परस्पर ताब्यात घेण्याची प्रकिया सुरू केल्यानंतर खराडी रेसिडेन्शिअल वेल्फेअरकडून विरोध दर्शविण्यात आला आहे. असोसिशनच्या अध्यक्षा प्रभा करपे यांच्यासह सदस्य प्रशांत मेहता आणि नितीन करोडे, योगिता अंबाडे यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन काम थांबविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनाही बोलाविण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही काम सुरूच होते.

हेही वाचा

डॉक्‍टर्स डे : सेवाभावी वृत्ती जपावी!

इंदापूर परिसरातील पावसाअभावी पिके लागली जळू

मंचर : पोलिस पाटील पदाचे 96 गावांचे आरक्षण जाहीर

Back to top button