जनतेचे अभिलेख खासगी कर्मचार्‍यांच्या ताब्यात | पुढारी

जनतेचे अभिलेख खासगी कर्मचार्‍यांच्या ताब्यात

सीताराम लांडगे : 

लोणी काळभोर : शासकीय कार्यालयात खासगी कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यास बंदी आहे. असे असतानाही हवेली तालुक्यातील महसूलच्या मुख्यालयात तब्बल 27 खासगी कर्मचार्‍यांंची बेकायदा नेमणूक असल्याने महसूल विभागातील दस्त व अभिलेख जतन करणे कायद्याचा भंग होत आहे. परिणामी, तालुक्यातील जनतेचे अभिलेख खासगी कर्मचार्‍यांंच्या ताब्यात असल्याने त्याची सुरक्षितता वार्‍यावर आली आहे.

कोणत्याही शासकीय कार्यालयात खासगी कर्मचारी नेमणूक करण्यास शासनाची बंदी आहे. असे असतानाही हवेली तालुक्यात मुख्यालयात म्हणजे तहसील कार्यालयात तब्बल 27 खासगी कर्मचारी आहेत, तर आठ मंडलाधिकारी कार्यालयात 36 खासगी कर्मचारी, तर 46 तलाठी कार्यालयांत 135 खासगी कर्मचारी बेकायदा कामकाज पाहत आहेत. या सर्व कार्यालयांतील प्रमुखांना कायद्याचा कोणताही धाक नाही. तालुक्यातील एका तलाठी कार्यालयात खासगी कर्मचारी लाच घेताना रंगेहाथ सापडला. त्यास भ—ष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 12 अन्वये संबंधित लोकसेवकाने साहाय्य व प्रोत्साहन दिल्याने महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम 1979 सुधारणा नियम 8 नुसार शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महसूल विभागाला आदेश दिल्यानंतर तलाठ्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊन निलंबित करण्यात आले. यानंतरही हवेली तालुक्यात खासगी कर्मचारी नेमणुका करण्यास कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध झाला नाही.

त्यानंतर पुन्हा एकदा वाघोली तलाठी कार्यालयात दोन खासगी कर्मचारी लाच घेताना रंगेहाथ सापडले व त्यांच्यावर फौजदारी कारवाई झाली. पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महसूल विभागाला शासकीय कार्यालयात खासगी कर्मचारी नेमणूक करण्याचा अधिकार लोकसेवकास आहे का? कोणाच्या परवानगीने नेमणुका केल्या जातात अशी स्पष्ट विचारणा केली. तरीही खुलेआम बिनदिक्कतपणे हवेली तालुक्यातील मुख्यालयासह सर्व मंडलाधिकारी कार्यालयात व तलाठी कार्यालयात खासगी कर्मचारी यांची बेकायदा नेमणूक असल्याने तालुक्यातील जनतेची खुलेआम आर्थिक मोठ्या प्रमाणात लुट सुरू आहे. यास कोणताही महसूल अधिकारी पायबंद घालत नसल्याचे विदारक चित्र हवेली तालुक्यात पाहावयास मिळत आहे. जशी एका तलाठ्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली तशीच कारवाई वरील संबंधित कार्यालयीन प्रमुखांवर होणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

या संदर्भात माहिती घेऊन अहवाल मागवण्यात येईल व त्यानंतर संबंधितावर कारवाई करण्यात येईल.
                                                  ज्योती कदम, निवासी उपजिल्हाधिकारी.

 

Back to top button