पुणे : रेल्वे ट्रॅकवरील रस्त्याला खड्डे ; खडकी परिसरातील स्थिती | पुढारी

पुणे : रेल्वे ट्रॅकवरील रस्त्याला खड्डे ; खडकी परिसरातील स्थिती

खडकी : पुढारी वृत्तसेवा :   खडकी येथील किर्लोस्कर ऑइल कंपनीशेजारी असलेल्या रेल्वे ट्रॅकवरील रस्त्याला खड्डे पडले आहेत. यामुळे दुचाकी वाहनचालक घसरून पडत असून, काही जण जखमी होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. यामुळे प्रशासनाने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालक व नागरिकांनी केली आहे. किर्लोस्कर कंपनीजवळ रेल्वे ट्रॅक आहे. या ट्रॅकच्या दोन्ही बाजूला असलेला रस्ता उंच झाला आहे. या रस्त्यावर खड्डे पडले आहेत.

तसेच सध्या पाऊस पडत असल्याने हा रस्ता निसरडा झाल्याने या ठिकाणी अनेक दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. यामुळे अनेक जण जखमीही होत आहेत. या रस्त्यावर खड्ड्यांत सध्या पाणी साचल्याने वाहनचालकांना अंदाज येत नाही. रेल्वे ट्रॅक लोखंडी असल्याने तो पावसामुळे सध्या ओला झाल्याने दुचाकींसह इतर वाहनांनादेखील अपघात होत आहेत. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि पुणे महापालिकेच्या सीमेवर असलेल्या या रस्त्याच्या दुरुस्तीकडे मात्र दोन्ही प्रशासनांचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

दुरुस्तीची मागणी
पुणे-नाशिक रस्त्यावर सध्या मेट्रोचे काम सुरू आहे. पुण्याकडून पिंपरीकडे जाण्यासाठी, तर बोपोडीहून पुण्याकडे येण्यासाठी खडकी मार्गाने एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. यामुळे या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भरधाव येणार्‍या वाहतुकीमुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे प्रशासनाने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

हे ही वाचा : 

राज्यात ४० हजार कोटींची गुंतवणूक, नाशिकला ठेंगा

पुणे : कधी शर्ट, तर कधी पँट वेगळी ! नव्या रिक्षाचालकांकडून युनिफॉर्म नियमांची ऐशीतैशी

Back to top button