‘आरोग्य’च्या परीक्षांचे लवकरच नियोजन : आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत | पुढारी

‘आरोग्य’च्या परीक्षांचे लवकरच नियोजन : आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  लोकसंख्या जास्त आणि डॉक्टरांची संख्या कमी ही अवस्था संपूर्ण राज्यात पहायला मिळत आहे. त्यामुळे रिक्त पदांची भरती करण्याची मागणी केली जात आहे. आरोग्य विभागाच्या गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गाच्या परीक्षा गेल्या 20 महिन्यांपासून रखडल्या होत्या. अखेर त्यास मुहूर्त मिळाला असून, महिनाभरात आढावा घेऊन परीक्षांचे नियोजन केले जाणार आहे. गैरप्रकारामुळे संबंधित परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले होते.

आरोग्य विभागाच्या गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गाच्या परीक्षा गैरप्रकारामुळे रद्द करण्यात आल्या होत्या. तब्बल 6205 पदांसाठी एकूण 8 लाख 66 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परीक्षा पुन्हा घेतल्या जातील, असे सांगितले. मात्र, परीक्षा होऊ न शकल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी होती. येत्या महिन्याभरात परीक्षेचे नियोजन जाहीर करणार असल्याचे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.

महिनाभरात परीक्षेचे नव्याने नियोजन करण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वी अर्ज केला आहे, त्यांना पुन्हा शुल्क भरण्याची गरज नाही. मात्र, ज्यांनी यापूर्वी अर्ज केला नव्हता, त्यांना शुल्क भरावे लागेल.
                                                                           – तानाजी सावंत, आरोग्यमंत्री

Back to top button