लोणावळा : ढाक बहिरी परिसरात भरकटलेल्यांना शोधण्यात यश

लोणावळा : ढाक बहिरी परिसरात भरकटलेल्यांना शोधण्यात यश

लोणावळा(पुणे) : ढाक बहिरी डोंगरावर फिरायला गेलेले चौघेजण पाऊस व धुक्यामुळे भरकटले. त्या भरकटलेल्या चौघांना शोधून काढण्यात शिवदुर्ग मित्र व मावळ वन्यजीव रक्षक पथकाला यश मिळाले आहे. मंगळवारी (दि. 27) सायंकाळी हे सर्वजण चुकले होते. मुसळधार पाऊस, रात्रीचा अंधार व धुके अशी बिकट परिस्थिती असतानाही ही अवघड शोध मोहीम राबवत रात्री उशिरा सर्वांना सुखरूप ठिकाणी सोडण्यात आले.

पुण्यातील एका महाविद्यालयातील चार मित्र चेतन कबाडे, सुमीत शेंडे, अमोल मोरे, आदित्य सांगळे हे मंगळवारी कोंडेश्वरमार्गे राजमाची किल्ला परिसरातील ढाकची बहिरी डोंगराकडे फिरायला गेले होते. मात्र तेथून परतत असताना ते रस्ता चुकले व भरकटत कुसूर पठाराकडे गेले. आपण चुकलो असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी मदतीसाठी फोन केले. मुले भरकटल्याची माहिती शिवदुर्ग मित्र लोणावळा, आपदा मित्र मावळ व वन्यजीव रक्षक मावळ संस्था तसेच कामशेत पोलिस व कोंडेश्वर ग्रामस्थ यांना मिळाल्यानंतर वरील सर्वांनी शोधमोहीम राबवली. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास चारही मुले कुसूर पठारजवळ सापडली.

या शोधमोहिमेत शिवदुर्ग मित्र लोणावळाचे सुनील गायकवाड, महेश म्हसणे, योगेश उंबरे, रतन सिंग, हर्ष तोंडे, वन्यजीव रक्षक मावळचे निलेश गराडे, गणेश निसाळ, गणेश ढोरे, विनय सावंत, सत्यम सावंत, शुभम काकडे, कमल परदेशी, जीगर सोलंकी, विकी दौंडकर, साहील नायर, पोलिस पाटील व ग्रामस्थ सहभागी झाले होते. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास कोंडेश्वर याठिकाणी चारही मुलांना सुखरूप कामशेत पोलिसांच्या ताब्यात दिले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news