आषाढी एकादशी विशेष : पुण्यातल्या या विठ्ठल मंदिरांबाबत तुम्हाला माहिती आहे का ?

आषाढी एकादशी विशेष : पुण्यातल्या या विठ्ठल मंदिरांबाबत तुम्हाला माहिती आहे का ?

विठुमाउलीच्या भेटीसाठी पालख्या अन् लाखो वारकरी पंढरपूरला पोहोचलेत. संपूर्ण पंढरी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलमय झाली आहे…वारकर्‍यांना विठुमाउलीचे अखेर गुरुवारी (दि.29) दर्शन घडणार आहे. पंढरीत जसा भक्तीचा सोहळा रंगला आहे, त्याचेच प्रतिबिंब पुण्यातही दिसणार आहे. शहरातील जुनी अन् प्राचीन मंदिरेही आषाढीच्या भक्तित्सवात न्हावून जाणार आहेत. टाळ-मृदंगाचा गजर, भजन-कीर्तनाचे सुर अन् श्री विठुमाउलीचे दर्शन घेणार्‍या लाखो भाविकांची मांदियाळी मंदिरांमध्ये पाहायला मिळणार आहे.

बाराव्या शतकातील श्री निवडुंगा
श्री निवडुंगा विठोबा मंदिर 12 व्या शतकातले असून, येथील श्री विठ्ठल मूर्ती ही स्वयंभू आहे. आधी या मंदिरात केवळ विठ्ठलाचीच मूर्ती होती. 1968 ला येथे रुक्मिणीची मूर्ती बसवण्यात आली. 338 वर्षांपूर्वी संत श्री तुकाराम महाराज यांचे चिरंजीव श्री नारायण महाराज यांनी वारीला सोहळ्याचे स्वरूप दिले. देहूमधून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका घेऊन ते ज्येष्ठ सप्तमीला निघायचे, पुढे असलेल्या आळंदीमध्ये ते अष्टमीला यायचे, तिथून माउलींच्या पादुका घ्यायच्या आणि नवमीला वारी सुरू करून ते पुण्यात यायचे. दशमीला वारीच्या मुक्कामाची परंपरा या मंदिरात तेव्हापासून आहे. नारायण महाराजांनी सुरू केलेली ही परंपरा आजही तशीच आहे. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम येथे असतो.

दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीला विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहे. मंदिर फुलांनी सजविले असून, मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी दिवसभर खुले राहील.
                                      – आनंद पाध्ये, व्यवस्थापक, श्री निवडुंगा विठोबा मंदिर

श्री पालखी विठ्ठल मंदिर भवानी पेठ
मंदिरात आषाढी वारीनिमित्त परंपरेनुसार संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखीचा विसावा असतो. हे मंदिर प्राचीन असून, अनेक वर्षांपासून येथे संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा मुक्कामी असतो. ह.भ.प. हैबतबाबा हे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका घेऊन मंदिरात आले होते. तेव्हापासून पालखी सोहळा मंदिरात वास्तव्यास असण्याची परंपरा सुरू झाली, ती अवितरपणे सुरू आहे.

165 वर्षे जुने मंदिर , नवी पेठ
या मंदिराला 165 वर्षे पूर्ण झाले असून, मंदिरामध्ये पंढरपूरहून परतीच्या प्रवासात संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचा विसावा असतो. सध्या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू असून, ते लवकरच पूर्ण होईल. आषाढी एकादशीला मंदिरात विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

विठ्ठलवाडीतील प्रति पंढरपूर

श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर या प्राचीन मंदिराची प्रति पंढरपूर अशीही ओळख आहे. आषाढी एकादशीला येथे भाविकांची गर्दी असते. या मंदिराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. श्री विठ्ठलाचे भक्त असलेल्या संभाजी गोसावी यांना दृष्टांत झाल्यानंतर त्यांना श्री विठ्ठलाची मूर्ती त्यांच्या शेतात सापडली. त्या मूर्तीची संभाजी गोसावी यांनी प्रतिष्ठापना केली. मंदिर हे तीन टप्प्यात बांधण्यात आले. मंदिराचा जीर्णोद्धार करत करत मंदिराची स्थापना झाली, त्यानंतर दर्शनाला भाविक येऊ लागले.

पासोड्या विठोबा मंदिर, बुधवार पेठ

हे मंदिर 14 व्या शतकात बांधण्यात आले. मंदिराचे नाव त्याकाळी जवळपासच्या भागात पासोड्या (बॅगा) विकल्या जात असतं, त्यावरून हे नाव ठेवले गेले. संत श्री तुकाराम महाराज या मंदिरात कीर्तनाचे कार्यक्रम करतं, असे मानले जाते. दगडी बांधकाम असलेले हे मंदिर पेशवेकालीन वास्तुशैलीत बांधण्यात आले आहे. पालखी सोहळ्यात या मंदिराला मानाचे स्थान आहे. वारीत वारकर्‍यांच्या दिंड्या एक
दिवस मंदिरात मुक्काम करतात. आषाढीला मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

1898 मधील पाटसकर मंदिर

कसबा पेठेतील व्यवहार आळी चौकात असलेले हे जुने मंदिर. कै. रामशेठ सखारामशेठ पाटसकर यांनी 1898 मध्ये स्थापन केले आणि आता या मंदिराची देखभाल पाटसकर कुटुंबीय पाहत आहेत. या मंदिराला वेगळेच महत्त्व असून, भाविकांसाठी हे मंदिर श्रद्धास्थान आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news