पुण्यातील निम्म्या पोलिस चौक्या रात्री बंद ; अपुर्‍या मनुष्यबळाचा परिणाम | पुढारी

पुण्यातील निम्म्या पोलिस चौक्या रात्री बंद ; अपुर्‍या मनुष्यबळाचा परिणाम

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  अपुर्‍या मनुष्यबळामुळे पुणे शहरातील जवळपास निम्म्या पोलिस चौक्या रात्री बंद ठेवाव्या लागतात. आहे त्या पोलिस कर्मचार्‍यांसह चौक्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याची सूचना पोलिस आयुक्तांनी दिली आहे. शहरात मंजूर असलेल्या 110 चौक्यांपैकी बारा बंदच आहेत, तर तब्बल चाळीस चौक्या रात्री बंद ठेवल्या जातात. दिवसा मात्र सर्व चौक्यांमध्ये पोलिस कर्मचारी उपस्थित ठेवून नागरिकांच्या मदतीला त्यांनी तातडीने गेले पाहिजे, असे वरिष्ठ अधिकार्‍यांनी बुधवारी स्पष्ट केले.

सदाशिव पेठेत भरदिवसा पोलिस चौकीजवळच तरुणीवर हल्ला झाल्यानंतर चौकीमध्ये अर्धा तास पोलिसच उपलब्ध झाले नाहीत. याच्या तीव्र प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर उमटल्या. राजकीय नेत्यांनीही यावर टीका केली. राज्य सरकारने अहवाल मागविला. त्यामुळे दैनिक मपुढारीफच्या प्रतिनिधीने पुण्यातील पोलिस चौक्यांच्या सद्य:स्थितीचा आढावा घेतला. त्यामध्ये निम्म्या चौक्या रात्री बंद असल्याचे समोर आले आहे. पुणे पोलिसांची चौकी सिस्टिम प्रभावी मानली जात होती. परिसरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस चौक्यांना विशेष महत्त्व आहे. तसेच नागरिकांचा पोलिसांशी संपर्क वाढतो.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून अपुर्‍या मनुष्यबळामुळे चौकी पद्धतीला उतरती कळा लागली आहे. अनेक चौक्यांतून दुपारच्या वेळी अधिकारी व कर्मचारी गायब असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नागरिकांना चौकीपासून पोलिस ठाण्यापर्यंत धाव घ्यावी लागते. दरम्यान, तत्कालीन पुणे पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी पोलिस ठाणेकेंद्रित कारभार चालावा म्हणून पोलिस चौक्या बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळी मोठी टीका झाली होती. त्यानंतर पोलिस आयुक्त म्हणून आलेल्या मीरा बोरवणकर यांनी चौक्या प्रभावीपणे सुरू केल्या तसेच चौकी सक्षमीकरण योजना देखील हाती घेतली होती.

उपलब्ध मनुष्यबळ
पुणे शहराच्या साठ लाख लोकसंख्येसाठी 32 पोलिस ठाण्यांतर्गत तब्बल 110 पोलिस चौक्या आहेत. आयुक्तालयाकडे सद्य:स्थितीत 8 लाख 631 पोलिस कर्मचारी मंजूर आहेत. त्यातील 7 हजार 706 उपलब्ध आहेत. तर एक पोलिस आयुक्त, एक सह पोलिस आयुक्त, चार अपर पोलिस आयुक्त, 10 पोलिस उपायुक्त, 26 सहायक पोलिस आयुक्त, 146 पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक 204, पोलिस उपनिरीक्षक 406 असे मनुष्यबळ उपलब्ध आहे.

चौकीतील कर्मचार्‍यांची चौकशी
तरुणीवर हल्ला करणार्‍या तरुणाला पकडून नागरिकांनी पेरुगेट पोलिस चौकीत आणले. त्या वेळी तेथे पोलिसच नसल्याचे समोर आले. याबाबत समाजमाध्यमांत तीव्र  प्रतिक्रिया उमटल्यानंतर पोलिस आयुक्तांनी याची गांभीर्याने दखल घेतली असून, पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांना याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पोलिस चौकीतही सीसीटीव्ही
शहरातील प्रत्येक पोलिस चौकीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. अनेकदा चौकीचे कर्तव्य दिल्यानंतर पोलिस कर्मचारी तेथे हजर नसतात. त्यामुळे आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच रात्री व दिवसा किमान दोन पोलिस कर्मचारी चौकी कर्तव्यावर हजर राहतील, याबाबत प्रयत्न केले जाणार असल्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

Ashadhi Ekadashi Mahapuja : अहमदनगरचे काळे दांपत्य ठरले मानाचे वारकरी; मुख्यमंत्र्यांसह केली विठ्ठलाची महापूजा

संभाजी भिडे यांना अटक करा, ते बहुजनांच्या पोरांना भडकावताय : छगन भुजबळ

Back to top button