क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारी जाहीर ; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची घसरण | पुढारी

क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारी जाहीर ; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची घसरण

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  जागतिक स्तरावर प्रतिष्ठेची मानली जाणारी क्वॅकेरली सायमंड्स (क्यूएस) जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2024 जाहीर करण्यात आली. त्यात आयआयटी मुंबईने जगातील पहिल्या 150 संस्थांमध्ये स्थान मिळवण्याची कामगिरी केली आहे. तर गेल्यावर्षीच्या तुलनेत मुंबई विद्यापीठाने स्थान उंचावले असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मोठी घसरण झाली आहे.
क्यूएसकडून दरवर्षी जगभरातील विद्यापीठांची क्रमवारी जाहीर करण्यात येते. शैक्षणिक प्रतिष्ठा, विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर, आंतरराष्ट्रीय शिक्षक, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी, आंतरराष्ट्रीय संशोधन, शाश्वतता अशा निकषांवर मूल्यमापन करण्यात आले.

या क्रमवारीत जगातील पहिल्या पाचशे संस्थांमध्ये देशभरातील देशभरातील 45 विद्यापीठांचा समावेश आहे. क्रमवारीत मॅचाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) पहिल्या स्थानी आहे. 2012 पासून एमआयटीने पहिला क्रमांक कायम राखला आहे. त्याखालोखाल केंबि—ज विद्यापीठ दुसर्‍या आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ तिसर्‍या स्थानी आहे. क्रमवारीमध्ये आशियातील चीन आणि जपाननंतर भारतातील विद्यापीठांचा समावेश आहे.

गेल्यावर्षीच्या क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 541 ते 550 या गटात समावेश होता. मात्र 2024 साठीच्या क्रमवारीत विद्यापीठाची मोठी घसरण होऊन विद्यापीठ 711 ते 720 या गटात फेकले गेले. तर गेल्यावर्षी 1001 ते 1200 या गटात असलेल्या मुंबई विद्यापीठाने कामगिरी उंचावत 751 ते 760 या गटात स्थान प्राप्त केले. राज्यातील महत्त्वाची असलेली ही दोन्ही विद्यापीठे क्रमवारीतील शैक्षणिक प्रतिष्ठा, विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर, आंतरराष्ट्रीय शिक्षक, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी, आंतरराष्ट्रीय संशोधन, शाश्वतता या निकषांवर कमी पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

Back to top button