पुणे : तोरणाच्या दुर्गम भागातील रुग्णवाहिका बंद | पुढारी

पुणे : तोरणाच्या दुर्गम भागातील रुग्णवाहिका बंद

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा :  तोरणागडाच्या दुर्गम भागातील पासली (ता. वेल्हे) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका ऐन पावसाळ्यात बंद असल्याने रुग्णांचे हाल सुरू आहेत. तसेच मुख्य वैद्यकीय अधिकारी केंद्रात थांबत नसल्याने रुग्णांना खासगी दवाखान्यात जावे लागत आहे, अशी तक्रार स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

मंगळवारी (दि. 27) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पासली येथे घराच्या अंगणात खेळत असताना वेदिका किसन घाटे (वय 7) या चिमुरडीला सर्पदंश झाला. तिला उपचारांसाठी जवळील पासली आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, मुख्य वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने सहायक डॉक्टरांनी मुलीला वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. मात्र, वेदिका हिला वेल्हे येथे घेऊन जाण्यासाठी आरोग्य केंद्राची रुग्णवाहिकाही उपलब्ध नव्हती. त्यामुळे वेदिकाचे नातेवाईक, ग्रामस्थांची धावपळ सुरू झाली.
वेदिकाचे वडील वेल्हे येथील एका संस्थेच्या वाहनांवर चालक आहेत. ते संस्थेची रिक्षा घेऊन पासली येथे गेले. तेथून रिक्षातून वेदिका हिला वेल्हे येथे आणले. दुपारी चार वाजता तिला वेल्हे येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. ए. भोईटे यांनी वेदिकावर तातडीने उपचार सुरू केले.

चार दिवसांपूर्वीही बार्शीचा माळ (ता. वेल्हे) येथे वृक्षाली भुरुक हिला अत्यवस्थ अवस्थेत पासली आरोग्य केंद्रात उपचारांसाठी आणले होते. त्या वेळी तिला उपचारांसाठी दुसर्‍या रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. मात्र, रुग्णवाहिका नसल्याने भुरुक यांना हलाखीला तोंड द्यावे लागले. किसन घाटे, ग्रामस्थ पासली म्हणाले की, गेल्या दोन महिन्यांपासून आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका बंद आहे. वेल्हे येथील 108 क्रमांकाची रुग्णवाहिका दुर्गम डोंगराळ भागात दूर अंतरावर येण्यास उशीर होतो. त्यामुळे सर्पदंश, गरोदर माता अशा रुग्णांचे वेळेवर उपचार न मिळाल्यास मृत्यू होण्याचा
धोका आहे.

Back to top button