पुणे : ‘एसआरए’च्या बोगस लाभार्थींची चौकशी ; दोषींवर गुन्हे दाखल होणार | पुढारी

पुणे : ‘एसआरए’च्या बोगस लाभार्थींची चौकशी ; दोषींवर गुन्हे दाखल होणार

येरवडा ( पुणे ) : पुढारी वृत्तसेवा : विश्रांतवाडी परिसरातील स. नं. 112मधील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) योजनेत बोगस लाभार्थींना घरे व दुकाने मंजूर झाली आहेत. याबाबत दैनिक ‘पुढारी’ने नुकतेच वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत लाभार्थींच्या मूळ कागदपत्रांची फेरतपासणी करण्याचे आदेश प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी दिले आहेत. यात दोषी आढळणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या योजनेवर स्थानिक रहिवाशांनी अक्षेप घेतला आहे. तरीदेखील विकसकाने बाहेरील लोकांची नावे पात्रता यादीत टाकून 70 टक्के संमती मिळवली आहे. योजना मंजूर होऊन टीडीआर आणि एफएसआय वाढीसाठी ‘एसआरए’च्या अधिकार्‍यांना हाताशी धरून गैरप्रकार केला आहे. पात्रता यादी तपासली असता याअगोदर कधीही वास्तव्यास नसलेल्या लोकांना घरे मंजूर झाली आहेत, तर वस्तीमध्ये यापूर्वी दुकान नसताना काहींना दुकाने मंजूर झाली आहेत. यासाठी बनावट कागदपत्रे जोडली आहेत.

याबाबत रहिवासी शब्बीर शेख यांनी गटणे यांच्यासह उपजिल्हाधिकारी प्रतिभा इंगळे यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. या योजनेतील गैरप्रकाराबाबत दैनिक ‘पुढारी’ने नुकतेच वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर गटणे यांनी प्राप्त झालेल्या तक्रारींची चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. यात दोषी आढळणार्‍या बोगस लाभार्थींवर गुन्हे दाखल करून विकसकावरही कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Back to top button