पिंपरी : जिजामाता रूग्णालयातील लिपिकाकडून 16 लाखांचा अपहार | पुढारी

पिंपरी : जिजामाता रूग्णालयातील लिपिकाकडून 16 लाखांचा अपहार

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपरी कॅम्प येथील जिजामाता रुग्णालयातील लिपिकाने कामावर नसलेल्या मानधनावरील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या नावाने पगार काढून त्यातील अर्धी रक्कम स्वत: घेतली. हा प्रकार गेल्या अडीच वर्षांपासून सुरू होता. यामध्ये तब्बल 16 लाख 10 हजार 929 रुपयांचा अपहार करून पालिकेची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे लिपिकाचे निलंबन करून विभागीय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत.

दत्तात्रय विठ्ठल पारधी असे त्या लिपिकाचे नाव आहे. लिपिक पारधी हा मानधनावरील अधिकारी व कर्मचार्‍यांचे पगार बिल काढतो. या बिलात चुका आढळत असल्याने वैद्यकीय विभागाने चौकशी केली. त्यात कामावर नसलेल्या मानधनावरील अधिकारी व कर्मचार्‍यांचे पगार लिपिक पारधी याने काढल्याचे आढळून आले. त्यातील अर्धी रक्कम लिपिक आपल्या बँक खात्यावर जमा करून घेत होता.

प्रत्यक्ष काम करणारे कर्मचारी व पगाराची बिले काढलेली संख्या यात तफावत दिसून आली. हा प्रकार सप्टेंबर 2020 ते मार्च 2023 पर्यंत सुरू होता. त्यात 16 लाख 10 हजार 929 इतका आर्थिक अपहार झाल्याचे आढळून आले आहे. लिपिक पारधी यांनी अपहार केल्याचे मान्य केले आहे. पालिकेची आर्थिक फसवणूक केल्याने आयुक्त सिंह यांनी त्याचे तातडीने निलंबन केले आहे. तसेच, विभागीय चौकशी 15 दिवसांच्या आत पूर्ण करून दोषरोपपत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

फौजदारी न करता अभय देण्याचा प्रकार

महापालिका कर्मचारी असतानाही आर्थिक अपहार करण्यात आला आहे. हा प्रकार अडीच वर्षे बिनबोभाट सुरू होता. या प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल न करता त्या लिपिकाकडून संबंधित रक्कम भरून घेऊन अभय देण्याचा प्रकार प्रशासनाकडून केला जात असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.

वरिष्ठ अधिकार्‍यांचा सहभाग

कामावर नसलेल्या मानधनावरील अधिकारी व कर्मचार्‍यांची तब्बल अडीच वर्षे पगार बिल काढण्यात आली. त्यात लिपिक पारधी याच्यासोबत लेखा विभागाचे इतर अधिकारी व वैद्यकीय विभागाचे वरिष्ठ अधिकारीही सामील असण्याची दाट शक्यता आहे. त्याशिवाय पगाराचे बिल मंजूर होऊ शकत नाहीत. त्यामुळे हा प्रकार इतके दिवस उघड झाला नाही, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
इतर रुग्णालये व दवाखान्यांतही

असे प्रकार घडण्याची शक्यता

महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम), भोसरी, जिजामाता, तालेरा, आकुर्डी, थेरगाव यासह अनेक रुग्णालये व दवाखाने आहेत. त्या ठिकाणीही नामधनावरील अधिकारी व कर्मचारी नेमण्यात आले आहेत. तेथे असे गैरप्रकार व आर्थिक अपहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा

पिंपरी : बँकेचे हफ्ते सुरु; मात्र घरांची प्रतीक्षाच

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील महिलेचा सर्पदंशाने मृत्यू, रुग्णालयातील सुविधांवर प्रश्नचिन्ह

पिंपरी बाजारात भाज्यांच्या दरात वाढ; घ्या जाणून आजचे दर

Back to top button