फडणवीसांचं ‘ते’ स्टेटमेंट अज्ञानातून आलेलं : शरद पवार | पुढारी

फडणवीसांचं 'ते' स्टेटमेंट अज्ञानातून आलेलं : शरद पवार

पुढारी ऑनलाईन  :  सतत सुरू असलेल्या राजकीय कलगीतु-यात अलीकडेच देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांविषयी केलेल्या स्टेटमेंटने अनेकांच्या भुवया उंचावल्या. एका कार्यक्रमात फडणवीस यांनी “१९७८ मध्ये शरद पवार हे वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातील ४० आमदार घेऊन बाहेर पडले होते. त्यांनी तेव्हाच्या भाजपाबरोबर सरकार स्थापन केलं. ते सरकार दोन वर्षं चाललं. पंतप्रधान इंदिरा गांधींनी ते सरकार बरखास्त केलं नसतं तर ते सरकार पाच वर्षं चाललं असतं. म्हणजे तेव्हा पवारसाहेबांनी जे केलं ते मुत्सद्देगिरी आणि तेच एकनाथ शिंदे यांनी केलं तर गद्दारी? असं कसं चालेल?” हे विधान केलं होतं.

या विधानाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिलं आहे. शरद पवार म्हणतात, ‘ गद्दारी कधी केली हे त्यांनी सांगावं. 1977 साली आम्ही सरकार बनवलं पण त्यावेळी भाजपा माझ्यासोबत होता. ते लहान असल्याने त्यांना कदाचित पूर्वीचा इतिहास माहित नसेल. पण त्यांच्या माहितीसाठी सांगतो, मी जे सरकार बनवलं ते सगळ्यांना सोबत घेऊन बनवलं.कदाचित ते प्राथमिक शाळेत असतील. काळातील त्यांना काही माहिती नसेल. अज्ञानापोटी ते असं स्टेटमेंट करतात, यापेक्षा जास्त भाष्य करण्याची गरज नाही.”

अजितदादांच्या जबाबदारीबाबत पवार म्हणतात, अजित पवारांनी जबाबदारी बदलण्याबाबतच्या विधानावर ते म्हणतात, “हा निर्णय पक्षातील एकटा घेत नसतो. पक्षातील प्रमुख लोकांशी त्याबाबत चर्चा करुन त्यासंबंधी निर्णय घेतला जाईल. सध्या पक्षसंघटनेच्या कामात सगळ्यांनी लक्ष द्यावं अशी भावना आहे. तेच मत त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलं त्यापेक्षा जास्त काही नाही.”

हे ही वाचा : 

एकच फोन कॉल अन् मागणी मंजूर ! केंद्रीय राज्यमंत्री डॉ.कराडांच्या आश्वासनाने आशा पल्लवित

नाशिक : ठाकरे गटात प्रवेशाचा डॉ. अपूर्व हिरेंनी केला इन्कार

Back to top button