लिंडाऊ संमेलनासाठी पुणेकर संशोधकाची निवड ! | पुढारी

लिंडाऊ संमेलनासाठी पुणेकर संशोधकाची निवड !

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या लिंडाऊ संमेलनासाठी पुण्यातील शुभंकर अंबिके या पुणेकर संशोधकाची निवड झाली आहे. लिंडाऊ संमेलन हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वार्षिक अधिवेशन आहे. त्यामध्ये जगभरातील 40 नोबेल विजेते आणि 600 निवडक तरुण शास्त्रज्ञ भाग घेत असतात. हे अधिवेशन दरवर्षी फिजिक्स, केमिस्ट्री, फिजिओलॉजी, मेडिसिन, आणि इकॉनॉमिक्स या नोबेल पुरस्कार क्षेत्रांतील एका विषयावर केंद्रीत असते.

त्याद्वारे शिक्षण, प्रेरणा आणि सांस्कृतिक व राजकीय सीमांच्या पलीकडे जोडण्याची एक अनोखी संधी नव्या पिढीला उपलब्ध केली जाते. या वर्षीचे 72 वे लिंडाऊ अधिवेशन फिजिओलॉजी आणि मेडिसिन यावर केंद्रीत असून, 25 ते 30 जून या कालावधीत जर्मनी, ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंडच्या सीमेवर असलेल्या लिंडाऊ या जर्मन शहरात होणार आहे. जगभरातून दरवर्षी, हजारो विद्यार्थी आणि संशोधक या बैठकीत सहभागी होण्यासाठी अर्ज करतात आणि त्यांच्या करिअरनुसार व विज्ञानातील योगदानाच्या आधारावर निवडले जातात. हे अधिवेशन अशा निवडक तरुण संशोधकांसाठी नोबेल पारितोषिक विजेते आणि विज्ञान क्षेत्रातील प्रणेते यांना भेटण्याची संधी आहे. पुण्याचे रहिवाशी आणि सध्या म्युनिक-स्थित संशोधक शुभंकर अंबिके यांची या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी निवड झाली आहे. त्यांना काऊंसिल फॉर द लिंडाऊ नोबेल लॉरिएट मिटिंग्सने नामांकित केले आहे.

कोण आहेत शुभंकर अंबिके?
अंबिके हे जर्मनीतील म्युनिकच्या टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये पीएच. डी.च्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी आहेत. त्यांचे कार्य यकृत रोगप्रतिकारशास्त्र तसेच हिपेटायटीस आणि कोरोना विषाणूविरुद्ध उपचारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यावर आधारित आहे. कोविड-19 चा मुकाबला करण्यासाठी उपचारात्मक धोरणावरील त्यांचे अलीकडील संशोधन कार्य प्रसिद्ध आहे. अंबिके हे भावे हायस्कूल, मॉडर्न कॉलेज शिवाजीनगर आणि पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीचे माजी विद्यार्थी आहेत. व्हायरालॉजी आणि इम्युनोलॉजी या क्षेत्रातील त्यांच्या पुढील संशोधनासाठी त्यांचा भारतात परतण्याचा मानस आहे.

 

Back to top button