मंचर : काठापूर बुद्रुकला बिबट्याचे दर्शन | पुढारी

मंचर : काठापूर बुद्रुकला बिबट्याचे दर्शन

मंचर (पुणे ): पुढारी वृत्तसेवा :  काठापूर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील गणेशवस्ती या ठिकाणी नवनाथ कोंडीबा जाधव हे शेतकरी शेतात पाणी भरण्यासाठी जात असताना त्यांना बिबट्या दिसून आला. ते चारचाकी गाडीत असल्यामुळे बिबट्यापासून त्यांचा बचाव होऊ शकला. वन खात्याने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. काठापूर बुद्रुक गावच्या हद्दीतील गणेशवस्ती या ठिकाणी बिबट्याचा पुन्हा एकदा वावर वाढला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र असल्याने या परिसरात बिबटप्रवण क्षेत्र निर्माण झाले आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वच गावांमध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. सध्या या बिबट्यांमुळे रात्रीच्या वेळी पाणी भरण्यासाठी शेतकर्‍यांना शेतात जाणेही मुश्कील झाले आहे. काठापूर बुद्रुक येथील गणेशवस्ती या ठिकाणीही बिबट्याचा वावर वाढला असून, रोजच कोणत्या ना कोणत्या शेतकर्‍याला बिबट्या दिसून येतो. त्यामुळे या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या ठिकाणी एका बाजूला वन विभागाचे क्षेत्र असून, मोठ्या प्रमाणावर जंगल आहे. तर शेजारी उसाचे क्षेत्र असल्याने व पाणीही उपलब्ध असल्याने बिबट्यासाठी हा परिसर योग्य आहे.

रस्त्याकडची झाडेझुडपे काढून पिंजरा लावावा
वैदवाडी ते पोंदेवाडी या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर झाडे वाढल्याने या रस्त्यावर जाताना रात्रीच्या वेळी नागरिकांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने वैदवाडी ते पोंदेवाडी या रस्त्याकडची झाडेझुडपे काढावीत. त्याचप्रमाणे या ठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणी होत असल्याची माहिती पोंदेवाडीचे माजी सरपंच अनिल वाळुंज आणि काठापूर बुद्रुकचे माजी उपसरपंच विशाल करंडे यांनी केली आहे.

Back to top button