पुणे-सातारा मुख्य रस्त्यासह सेवा रस्ता पाण्याखाली | पुढारी

पुणे-सातारा मुख्य रस्त्यासह सेवा रस्ता पाण्याखाली

खेड-शिवापूर : पुढारी वृत्तसेवा : शनिवारी (दि. 24) सकाळच्या दरम्यान झालेल्या पावसामध्ये पुणे-सातारा मुख्य रस्त्यासह सेवा रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व खेड-शिवापूर टोलनाका ठेकेदार असलेल्या रिलायन्स इन्फ—ा यांच्या दुर्लक्षित कामांमुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता.
शनिवारी सकाळी 9च्यादरम्यान पाऊस सुरू झाला आणि बघता बघता रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले. खरंतर पावसाळ्यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व खेड-शिवापूर टोलनाक्यावरील ठेकेदार यांनी सेवा रस्त्यांवरील गटारांची दुरुस्ती तसेच सफाई करणे गरजेचे होते.

मात्र, याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. परिणामी, शिंदेवाडी ते खेड-शिवापूर टोलनाका या दरम्यानच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. सेवा रस्ता तर पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. मुख्य रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे चारचाकी गाड्या व दुचाकी यांची वाहतूक संथगतीने सुरू होती. या वेळी अपघाताचा धोका निर्माण झाला होता. या सेवा रस्त्यांवरील गटाराची कामे पूर्ण करून पूर्ण झालेल्या गटारांची सफाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Back to top button