

संतोष वळसे पाटील :
मंचर : आषाढ महिना सुरू झाल्याने चिकन आणि अंड्यांच्या दरात दिवसागणिक वाढ सुरूच आहे. चिकन आणि अंडी याचे बाजारभाव कडाडल्याने खवय्याच्या खाण्यावर विरजण पडले आहे, तर पोल्ट्रीचालक चांगला बाजारभाव मिळत असल्याने समाधानी आहेत. सध्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे, तसेच ब्रॉयलर पोल्ट्री फार्ममध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता वाढल्याने कोंबड्यांची मर दिवसागणिक 15 ते 20 होत आहे. मालाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्याने ब्रॉयलर कोंबडीच्या लिफ्टिंग रेटमध्ये वाढ झाली असून, हे दर 129 रुपयांपर्यंत गेले आहेत.
एक महिन्यापूर्वी 160 ते 180 रुपये किलो दराने मिळणारे चिकन सध्या 220 ते 240 रुपये किलो दराने विकत असल्याची माहिती कळंब येथील ख्वाजा गरीब नवाज चिकन सेंटरचे विक्रेते इसाक शेख आणि घोडेगाव येथील ब—ॉयलर कोंबडीचे होलसेल व्यापारी जावेद मिस्त्री तसेच फिरोज मिस्त्री यांनी दिली. मंचर शहरामध्ये चिकन व्यवसायिक स्पर्धेमुळे चिकन दरात तफावत असून, 180 ते 200 रुपये किलोने विक्री होत आहे. तसेच जुन्नर, खेड आणि शिरूर तालुक्यातही 220 ते 240 रुपये किलो दराने चिकन मिळत आहे.
अंड्याच्याही बाजारभावामध्ये प्रचंड वाढ झाली असून, अंड्याचे दर शेकडा 600 रुपयांपर्यंत गेले आहेत. परिणामी, बहुतांशी ठिकाणी अंडी किरकोळ 7 रुपये दराने विकली जात आहेत. त्यामुळे अंडी उत्पादक शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. अंड्याच्या बाजारात मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. ऐन आषाढ महिन्यात अंड्याचे आणि चिकनचे दर टिकून राहण्याची शक्यता आंबेगाव अॅग्रो कंपनीचे शफीभाई मोमीन, ऊर्जा कंपनीचे प्रमोद हिंगे पाटील तसेच निरगुडसरचे पोल्ट्री शेतकरी प्रकाश वळसे पाटील यांनी वर्तवली.
मध्यंतरी सोयाबीन, मका यांचे बाजारभाव वाढल्याने अंड्याचे गणित बिघडले होते. त्यामुळे बहुतांशी अंडी उत्पादक शेतकर्यांनी आपले पोल्ट्री फार्म कायमस्वरूपी बंद केले आहेत, अशी माहिती जारकरवाडी वैदवाडी येथील पोल्ट्रीचालक मारुती बढेकर आणि सागर तापकीर यांनी दिली. मालाचा तुटवडा जाणवत असून, ब—ॉयलर कोंबडीच्या लिफ्टिंग रेटमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड वाढ झाल्याने चिकन दरामध्ये घाऊक बाजारात मोठी वाढ झाल्याची माहिती चांडोली बुद्रुक येथील आदर्श महिला पोल्ट्री चालक वैशाली विजय थोरात यांनी दिली.
पाण्याची कमतरता अन् कोंबड्यांची कमतरता
पाण्याच्या कमतरतेमुळे बहुतांश पोल्ट्री फार्म बंद असल्याने ब्रॉयलर कोंबड्यांची कमतरता जाणवत आहे. ब—ॉयलर कोंबड्यांचा उष्णतेपासून बचाव करण्यासाठी बर्याचशा पोल्ट्रीचालकांनी स्प्रिंकलर, फॉगर तसेच फॅन, कुलरची व्यवस्था पोल्ट्री फार्ममध्ये केली आहे. त्यामुळे पोल्ट्रीचालकांचा अनावश्यक खर्च वाढला आहे.
आषाढ महिन्यात गावठी कोंबडी आणि गावठी कोंबड्यांनाही मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. गावठी कोंबडा 600 ते 700 रुपयांना, तर गावठी कोंबडी 500 रुपयापर्यंत मिळत आहे.
यासीमभाई मोमीन, पोल्ट्री चालक, शिनोली.