पुणे : बीजे महाविद्यालय दहावे ; वैद्यकीय शिक्षण विभागाकडून क्रमवारी जाहीर | पुढारी

पुणे : बीजे महाविद्यालय दहावे ; वैद्यकीय शिक्षण विभागाकडून क्रमवारी जाहीर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यातील 19 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्न रुग्णालयांची पाहणी करून क्रमवारी जाहीर केली आहे. रुग्णालयांमधील सुविधा, स्वच्छता, डॉक्टर आणि कर्मचार्‍यांच्या उपस्थितीची नियमितता, शासकीय योजनांची अंमलबजावणी आदी निकषांच्या आधारावर झालेल्या पाहणीत बीजे वैद्यकीय महाविद्यालय दहाव्या क्रमांकावर आहे. राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागाने वैद्यकीय महाविद्यालयांच्या रँकिंगचा उपक्रम सुरू केला आहे. यासाठी विभागाने विशेष कामगिरी देखरेख आणि विश्लेषण कक्ष स्थापन केला आहे.

महिन्याच्या दर तिसर्‍या बुधवारी सचिवांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात बैठक आयोजित केली जाणार आहे. पाहणीमध्ये गुणवत्तेच्या आधारावर सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी वर्गवारी करण्यात आली आहे.

सर्वेक्षणामध्ये प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा फुले जनआरोग्य योजना, कर्मचार्‍यांचे ऑपरेशन आणि व्यवस्थापन, एका महिन्यात होणार्‍या शस्त्रक्रियांची संख्या, डॉक्टरांची संख्या, एकूण औषध खरेदी इत्यादींचा समावेश आहे. यामध्ये मातामृत्यू, बालमृत्यू, शवविच्छेदनाची संख्या, डायलिसिस, सुपरस्पेशालिटी सेवा यांचा समावेश नाही.

शासकीय महाविद्यालयांची वर्गवारी खालीलप्रमाणे :
सुवर्ण श्रेणी (गुण) : आंबे-जोगाई (59.2), जेजे मुंबई (58.3), सोलापूर (56.1), लातूर (50.3), जळगाव (45.5), अकोला (39.2)
रौप्य श्रेणी : नांदेड (38.1), गोंदिया (37.5), सातारा (36.0), बीजे पुणे (33.6), आयजीएमसी नागपूर (31.9), कोल्हापूर (31.6), धुळे (29.2)
कांस्य श्रेणी : औरंगाबाद (24.7), बारामती (24), यवतमाळ (22.5), चंद्रपूर (17.2), जीएमसी नागपूर (16.6), मिरज-सांगली (14.2)

बीजे महाविद्यालयात बायोमेट्रिक हजेरीमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. अनेक जण इन पंच करतात; मात्र आऊट पंच करीत नाहीत. काही जण कॉन्फरन्सला गेल्याने पंच करू शकत नाहीत. छोट्या शस्त्रक्रियांचीही नोंद ठेवण्यास आता सांगण्यात आले आहे. महात्मा फुले योजनेतील नोंदी कमी असल्याचे दिसत आहे. सदर योजनेमध्ये मोतीबिंदू, प्रसूती आदींचा समावेश नाही. अनेक जणांचा कागदपत्रांचा अभाव असतो. अनेक जण बाहेरच्या राज्यातून आलेले असतात. सर्व त्रुटी दूर करण्यात येतील आणि बीजे मेडिकल काही कालावधीत पहिल्या क्रमांकावर आलेले दिसेल.
                            – डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, बीजे वैद्यकीय महाविद्यालय

Back to top button