

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महसूल विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील पदांच्या सरळसेवा भरतीच्या अनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), नवीन प्रशासकीय इमारत दुसरा मजला, पुणे या ठिकाणी 'तलाठी भरती कक्ष' सुरू करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण 4 हजार 644 पदांच्या सरळसेवा भरतीकरिता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य) कार्यालयाकडून राज्यातील एकूण 36 जिल्ह्यांच्या केंद्रावर ऑनलाइन (कंप्युटर बेस्ड टेस्ट) परीक्षा घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाने राज्यातील तलाठी पदभरती राबविण्यासाठी राज्यस्तरीय नोडल अधिकारी म्हणून अप्पर जमाबंदी आयुक्त तथा अतिरिक्त संचालक भूमि अभिलेख पुणे यांची नेमणूक केली आहे. त्या अनुषंगाने कार्यालयाच्या वतीने 'तलाठी भरती कक्ष' सुरू करण्यात आला आहे.
या कक्षामध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याकरिता सामान्य प्रशासन विभागाच्या 4 मे 2022 आणि 21 नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णयामधील तरतुदी व मार्गदर्शक सूचनानुसार नमूद कंपन्यांची व्यवहार्यता तपासून कंपनीची निवड करणे, एजन्सीने निवडलेले परीक्षा केंद्र क्षेत्रीय यंत्रणेमार्फत तपासणे, पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रम तयार करून निवड केलेल्या कंपनीसोबत पदभरती प्रक्रियेसंबंधित सामंजस्य करार करणे, परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षेचे आयोजन, परीक्षेचा निकाल आदी प्रकारची कामे होणार आहेत.
हे ही वाचा :