पुणे : पालिकेच्या तक्रारींना पोलिसांचा ठेंगा ; गुन्हे दाखल करण्यासाठी होते टाळाटाळ | पुढारी

पुणे : पालिकेच्या तक्रारींना पोलिसांचा ठेंगा ; गुन्हे दाखल करण्यासाठी होते टाळाटाळ

हिरा सरवदे :
पुणे : महापालिकेच्या विविध विभागांकडून दिल्या जाणार्‍या तक्रारींना पोलिस विभागाकडून ठेंगा दाखवला जात असल्याचे समोर येत आहे. संबंधितांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेकडून वारंवार पत्र देऊनही गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ केली जाते. त्यामुळे महापालिकेकडून होणारी कारवाई केवळ फार्सच ठरत आहे.  महापालिकेकडून केलेल्या कारवायांवेळी अधिकारी आणि कर्मचारी यांना धमकावण्याचे किंवा मारहाण होण्याचे प्रकार घडतात.
त्याशिवाय बनावट कागदपत्रे तयार करून महापालिकेची फसवणूक करणे, खोटी बिले काढणे, कागदपत्रांची फेरफार करणे असेही अनेक प्रकार घडतात. अशा वेळी महापालिकेच्या अधिकार्‍यांना किंवा कर्मचार्‍यांना संबंधितांविरोधात पोलिस तक्रार द्यावी लागते.
मात्र, पोलिस प्रशासनाकडून महापालिकेला सहकार्य मिळत नाही. उलट पालिकेच्या अधिकार्‍यांनाच कागदपत्रांसाठी पळविले जाते. अनेक वेळा दिवसभर अधिकारी-कर्मचार्‍यांना पोलिस ठाण्यात किंवा चौकीत बसवूनही केवळ तक्रार अर्ज घेतला जातो. गुन्हा दाखल करण्यासाठी पुन्हा बोलावले जाईल, असे सांगितले जाते. गुन्हा दाखल केलाच तर पुढे काहीच कारवाई होत नाही. त्यामुळे महापालिकेकडून केली जाणारी कारवाई केवळ फार्सच ठरतो. गुन्हा करणार्‍यांवर वचक बसण्यासाठी पोलिसांत गुन्हा दाखल होणे आणि त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.
वर्षभरापूर्वी दिले होते पत्र  
महापालिकेने केलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली जावी, तसेच गुन्हा करणार्‍यांवर कारवाई व्हावी, यासाठी महापालिकेने जून 2022 मध्ये पोलिस सहआयुक्तांना महापालिकेच्या तक्रारींनुसार गुन्हा दाखल करण्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकार्‍याची नियुक्ती करावी, असे पत्र दिले होते. मात्र, त्यावर महापालिकेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
अशा आहेत तक्रारी
 एरंडवणा येथील एका बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यासाठी आरोग्य विभागाने 18 फेब्रुवारी 2022 रोजी संबंधित पोलिस ठाण्यास पत्र दिले. मात्र, पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही. दिलेल्या तक्रारीसंदर्भात पालिकेने वारंवार विचारणा करूनही अद्याप दखल घेतली नाही.
महापालिकेच्या वैद्यकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी बोगस रेशनकार्ड देणार्‍यावर आणि कागदपत्र तयार करून देणार्‍या एजंटवर विविध तीन प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यासाठी वैद्यकीय अधिकार्‍यांनी पोलिसांना तक्रार अर्ज दिले आहेत. मात्र, अद्याप गुन्हे दाखल केलेले नाहीत.
अनधिकृत होर्डिंगप्रकरणी गुन्हे दाखल करण्यासाठी महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये 200 पेक्षा अधिक पत्र दिली आहेत. मात्र, गुन्हे दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

Back to top button