Ashadhi Wari 2023: बावडा येथे तुकाराम महाराज पालखीच्या स्वागताची जय्यत तयारी | पुढारी

Ashadhi Wari 2023: बावडा येथे तुकाराम महाराज पालखीच्या स्वागताची जय्यत तयारी

बावडा : पुढारी वृत्तसेवा :  जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बावडा येथे शुक्रवारी (दि. 23) दुपारच्या मुक्कामासाठी येत आहे. या पालखी सोहळ्याच्या स्वागताची बावडा ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली असल्याची माहिती सरपंच किरण पाटील यांनी दिली.
इंदापूर येथील मुक्काम संपवून पालखी सोहळा वडापुरी, सुरवड, वकीलवस्ती मार्गे 17 किलोमीटर अंतर पार करून दुपारच्या मुक्कामासाठी बावडा येथे विसावणार आहे. बावडा येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे पालखीला खांदा देतात, त्यानंतर पालखी येथील बाजारतळावर उभारलेल्या भव्य शामियान्यात नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

यावेळी हर्षवर्धन पाटील यांचे रत्नाई निवासस्थानी हजारो वारकर्‍यांना भोजन देऊन संत तुकाराम महाराज देहू संस्थान व पालखी सोहळ्याच्या विश्वस्तांचा परंपरेनुसार सत्कार केला जाईल, शिवाय गावामध्ये घरोघरी वारकर्‍यांना भोजन देण्यात येते. ग्रामपंचायतीने गावात स्वच्छता मोहीम राबवली असून, वारकर्‍यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात आल्याची माहिती सरपंच किरण पाटील, उपसरपंच नीलेश घोगरे, ग्रामपंचायत सदस्य अमोल घोगरे, ग्रामविकास अधिकारी आंबिका पावसे यांनी दिली. दरम्यान, बावडा येथे पालखी सोहळा लवकर दुपारी 12.30 ते 1 वाजेपर्यंत दाखल व्हावा, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. बावडा येथून सायंकाळी पालखी सोहळा हा पुणे जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामासाठी सराटी (ता. इंदापूर) कडे प्रस्थान ठेवेल.

Back to top button