दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या अडचणी वाढल्या ; पाऊस लांबणीवर | पुढारी

दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या अडचणी वाढल्या ; पाऊस लांबणीवर

मांडवगण फराटा : पुढारी वृत्तसेवा :  खाद्याचा भाव, जनावरांच्या चार्‍याचे दुर्भिक्ष अन् दूध दरात झालेली घसरण यामुळे दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दूध व्यवसायाचे आर्थिक गणित जुळत नसल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. शिरूरच्या पूर्वभागातील अनेक शेतकरी शेतीबरोबरच दूध उत्पादनाचा व्यवसाय करत आहेत. गेल्या वर्षापासून दुधाला चांगला दर मिळू लागल्याने अनेक तरुणवर्ग या व्यवसायाकडे वळला. मध्यंतरी शेतकर्‍यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळू लागले होते. त्यामुळे काहींनी दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढवला. शेतमालापेक्षा दूधधंदा अधिक भरवशाचा वाटू लागल्याने काहींनी अत्याधुनिक गोठे बांधले.

अनेकांच्या गोठ्यात नव्याने गायी, म्हशी दिसू लागल्या. सुरुवातीला एक गाय घेतलेल्या शेतकर्‍यांकडे आता पाच ते दहा गायी झाल्या आहेत. मात्र आता दूध दरात घसरण झाली आणि त्यातच जनावरांच्या खाद्याचे दर कमालीचे वाढले. त्यामुळे दूध दराची खर्चासोबत सांगड घालणे अवघड होऊ लागले आहे. अनेक शेतकर्‍यांनी दूध संघांकडून गायी खरेदीसाठी अ‍ॅडव्हान्स पैसे घेतले आहेत. मात्र दूध संघाचे आगाऊ व पशुखाद्याचे पैसे वजा जाता शेतकर्‍यांच्या हातात काहीच रक्कम उरनेसा झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यातच चार्‍याचा तुटवडा जाणवत असून पाऊसही लांबला आहे. दुसरीकडे पाण्याची टंचाई, शेतातील पिके करपू लागली आहेत. शेतीमालाला हमीभाव नाही. मजुरांची वाढती मजुरी आदी संकटांनी शेतकरी पुरता घेरला गेला आहे.

दिवसेंदिवस जनावरांचे खाद्य वाढत चालले आहे, त्यामुळे शेतकर्‍यांना दुधाचे पैसे कमी व जनावरांचे खाद्य यांचे पैसे जास्त द्यावे लागत आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे दुधाचे दर कमी झाले आहेत, त्याप्रमाणे जनावरांच्या खाद्याचे दरही कमी होणे गरजेचे आहे.
– सचिन फराटे पाटील, संस्थापक अध्यक्ष, फराटे पाटील दूध संस्था, मांडवगण फराटा

पाऊस लांबल्याने सध्या चार्‍याची टंचाई जाणवू लागली आहे. हिरवा चारा उपलब्ध होत नाही, त्यामुळे दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. शेतकर्‍यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहेत.
– राहुल कदम, संचालक, शिवछत्रपती दूध संकलन केंद्र, शिरसगाव काटा

Back to top button