पाणीकपात केवळ नागरिकांसाठीच का ? बिबवेवाडी परिसरातील रहिवाशांचा सवाल | पुढारी

पाणीकपात केवळ नागरिकांसाठीच का ? बिबवेवाडी परिसरातील रहिवाशांचा सवाल

बिबवेवाडी (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा :  पुण्याला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा कमी होत असल्याचे कारण देत महापालिकेने शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात सुरू केली आहे. मात्र, कपातीच्या दिवशी पाणी विक्री करणार्‍या टँकर व्यावसायिकांसाठी मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध केला जात आहे. यामुळे ही कपात केवळ नागरिकांसाठीच आहे का, असा सवाल बिबवेवाडी परिसरातून उपस्थित केला जात आहे. पाणीकपातीच्या दिवशी रहिवासी क्षेत्र सोडले, तर शहरात ठिकठिकाणी महापालिकेच्या वतीने टँकर भरणा केंद्रावर मुबलक पाणीपुरवठा केला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

हे पाणी टँकर माफिया तिप्पट दराने सोसायटी, हॉटेल व बांधकाम व्यावसायिकांना विकत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिकांचा पाणीपुरवठा बंद असताना टँकर व्यावसायिकांना पाणीपुरवठा का केला जातो, सकाळी सहापासून संध्याकाळपर्यंत शेकडो टँकर पाणी कुठे व कोणाला दिले जाते, पाण्यासाठी रहिवाशांना वेठीस धरून टँकर व्यावसायिकांना कोण पोसत आहे,
असे प्रश्न यानिमित्ताने नागरिक उपस्थित करू लागले आहेत.

खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा कमी झाल्याचे सांगून महापालिकेने पुणेकरांवर पाणीकपात लादली आहे. मात्र, पाणीकपातीच्या दिवशी टँकर व्यावसायिकांना मुबलक पाणी उपलब्ध केले जात आहे. कपातीच्या दिवशी टँकरांना करण्यात येणारा पाणीपुरवठादेखील बंद झालाच पाहिजे; अन्यथा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागासमोर आंदोलन केले जाईल.
                             -नितीन कदम, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेल

बिबवेवाडी परिसरात दर गुरुवारी कपात असल्याने जिथे पाण्याची कमतरता भासते तिथे मागणीनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. खासगी टँकर व्यावसायिक महिन्याचे चलन भरतात व पाण्याची विक्री करतात. झोपडपट्ट्यांसह जिथे पाण्याची कमतरता आहे, अशा ठिकाणी महापालिकेच्या वतीने मोफत पाणीपुरवठा उपलब्ध केला जात आहे.
-काशिनाथ गांगुर्डे, सहायक अभियंता, बिबवेवाडी पाणीपुरवठा विभाग

Back to top button