पिंपरी : मिळकतकराचा सव्वादोनशे कोटींचा भरणा ऑनलाईन | पुढारी

पिंपरी : मिळकतकराचा सव्वादोनशे कोटींचा भरणा ऑनलाईन

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या करसंकलन विभागाकडे 82 दिवसांच्या विक्रमी वेळेत तब्बल 300 कोटींचा मिळकतकर जमा झाला आहे. यात 40 टक्के मिळकतधारकांनी आपले बिल जमा केले आहे. त्यामध्ये सर्वाधिक सव्वादोनशे कोटींचा भरणा ऑनलाईन माध्यमातून जमा झाला आहे. करवसुलीबाबत सध्या करसंकलन विभाग अ‍ॅक्शन मोडवर आहे. गतवर्षी जप्तीची केलेली कारवाई, करदात्यांना कर भरण्यासाठी आवाहन करण्याचे स्वीकारलेले नावीन्यपूर्ण मार्ग, यातून करदात्यांची मानसिकता बदलविण्यात विभागाला यश आले आहे, त्यामुळे बिल भरण्याचे प्रमाण वाढले आहे.

शहरात 6 लाख 2 हजार 203 विविध प्रकारच्या निवासी व बिगरनिवासी मिळकती आहेत. महापालिकेने चालू वर्षी 100 टक्के बिलांचे वाटप केले आहे. सध्या 30 जूनपर्यंत असणार्‍या मिळकतकरामधील सवलतींबाबत विविध माध्यमातून जनजागृती मोहीम राबविली जात आहे. यामध्ये एसएमएस, टेलिकॉलिंग, आयव्हीआरएस कॉलिंग, रील्स स्पर्धा, होर्डिंग्ज, पॅम्प्लेट, रिक्षाद्वारे आवाहन आदीमार्फत शहरामध्ये जनजागृती सुरू आहे.

नागरिक 1 एप्रिल ते 30 जून या कालावधीत सर्वाधिक प्रमाणात मिळकतकर भरतात. त्यासाठी करसंकलन विभागाने त्यांना प्रोत्साहित केले. जनजागृती उपक्रम व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यासाठी नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने 300 कोटींचा भरणा झाला आहे. उर्वरित मिळकतकरदात्यांनीसुद्धा 30 जूनपर्यंत कराचा भरणा करावा, असे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.

करसंकलनाची आघाडी वर्षभर कायम

गतवर्षीची जप्तीची कारवाई, प्रकल्प सिद्धी आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, यामुळे या वर्षी कर संकलनात पालिकेने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. ही आघाडी वर्षभर कायम राहील, अशी दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. सध्या सुरू असलेल्या मिळकत सर्वेक्षणाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

असा जमा झाला कर
ऑनलाईन-218 कोटी
रोख-39 कोटी
चेक व डीडी-26 कोटी
आरटीजीएस, एनइएफटी -20 कोटी

Back to top button