पावसाची ओढ; मत्स्यबीज उत्पादनही आले संकटात | पुढारी

पावसाची ओढ; मत्स्यबीज उत्पादनही आले संकटात

भरत मल्लाव : 

भिगवण : पावसाने कमालीची ओढ दिल्याने शेती जशी संकटात सापडली आहे तसे मत्स्यबीज उत्पादन निर्मितीवरही गंभीर संकट घोंगावत आहे. मत्स्यबीज निर्मितीवर यामुळे तब्बल पन्नास टक्के घट होणार आहे. प्रजननक्षम माश्यांना पोषक वातावरण निर्माण झाले नसल्याने ही गंभीर परिस्थिती ओढवली आहे. पुणे जिल्ह्यात मागणी झालेल्या 2 कोटी मत्स्यबीजचा पुरवठा कसा करायचा, असा प्रश्न मत्स्यव्यवसाय विभागाला भेडसवत आहे. महाराष्ट्रात 15 जूनपासून मत्स्यबीज निर्मितीला म्हणजे पाऊस सुरू होताच पोषक वातावरण निर्माण होते. तत्पूर्वी प्रजनक माश्यांची निवड, खाद्य पुरवठा करून प्रजनक मासे सशक्त बनवले जातात. मात्र, या वर्षी मत्स्यबीज हंगाम तारीख उलटून गेली तरी जिल्ह्यातील मत्स्यबीज उत्पादन केंद्रे ओस पडली आहेत.

दर वर्षी पाऊसकाळ सुरू होताच मत्स्यबीजाला मागणी सुरू होते. त्यानुसार शेत तलाव, पाझर तलाव, धरणांना मत्स्यबीज पुरवठा केला जातो. या मत्स्यबीज केंद्रात रोहू, कटला, मृगल, सिल्व्हर, गवत्या, सायप्रनीस या प्रमुख कार्प जातीचे मत्स्यबीज तयार केले जाते. मात्र, यंदा पावसाने दडी मारल्याने प्रजनक माश्यांना पोषक वातावरण निर्माण झालेले नाही.

घटही होणार आणि पुरवठ्यावर परिणाम होणार : सहायक आयुक्त भीमाशंकर पाटील
याबाबत पुण्याचे सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय भीमाशंकर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की जिल्ह्यात यंदा दोन कोटी बोटूकली आकाराची मत्स्यबीजाची मागणी झाली आहे. मात्र, याचा पुरवठा करणे अशक्य बनले आहे. पर्यायाने बाहेरच्या राज्यातून पुरवठा करण्याची वेळ यंदा येऊ शकते. जरी पुढे वातावरण निर्माण झाले, तरी मत्स्यबीज निर्मितीवर यंदा 50 टक्के परिणाम होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उत्पादन घटणार : किरण वाघमारे
मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी किरण वाघमारे म्हणाले, की जून, जुलै महिन्यात मत्स्यजिरे निर्मिती केल्यानंतर पूर्ण वाढ झालेल्या मत्स्यबीजचा पुरवठा जुलै-ऑगस्टमध्ये केला जातो. यंदा परिस्थिती तशी नसल्याने पुरवठा उशिरा होणार व या भागात तलावात बारमाही पाणीसाठा राहत नाही आणि नऊ, दहा महिन्यात जी अपेक्षित वाढ व्हायला हवी ती होणार नाही. परिणामी, मत्स्यउत्पादकांना कमी वजनाचे मासे विक्री करावी लागेल, यातून उत्पादन घटेल आणि दरही कमी मिळेल. तसेच पुढच्या वर्षी प्रजनक मासे मिळण्यात अडचणी येतील.

Back to top button