कारवाईपूर्वी कुरुलकरकडून मोबाईलशी छेडछाड | पुढारी

कारवाईपूर्वी कुरुलकरकडून मोबाईलशी छेडछाड

दिनेश गुप्ता/महेंद्र कांबळे : 

 पुणे : डीआरडीओ इंटेलिजन्स चौकशीत गळ्याला फास आवळला जाणार असल्याचे दिसताच डॉ. प्रदीप कुरुलकरने त्याच्या मोबाईलमध्ये असलेल्या चॅटिंगशी छेडछाड करून ‘ऑल क्लीअर’चा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले आहे. शिवाय तो मोबाईल कंपनीच्या अधिकृत तज्ज्ञांकडून दुरुस्त केल्याची शिफारस पुणे फॉरेन्सिक लॅबने केली होती. मात्र, असे केल्यास पुरावा नष्ट होऊ शकतो म्हणून जप्त मोबाईल गुजरातमधील गांधीनगर फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती न्यायालयात करण्यात आली आहे.

पाकिस्तानी ललनाच्या जाळ्यात अडकून भारतीय संरक्षण दलाची गोपनीय माहिती पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणेस दिल्याप्रकरणी दररोज नवनवीन ‘उद्योग’ समोर येत आहेत. कुरुलकरकडून जप्त केलेला वन प्लस मोबाईल अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. हेरगिरी प्रकरणाचा संशय आल्यानंतर कुरुलकर अटकेपूर्वी डीआरडीओ इंटेलिजन्स म्हणजे व्हिजिलन्स अँड सेक्युरिटीचे कर्नल प्रदीप राणा यांनी गोपनीय पद्धतीने चौकशी सुरू केली होती. गुन्ह्यात सहभागी असल्याचे स्पष्ट होताच त्याच्या ताब्यातील लॅपटॉप व मोबाईल जप्त केला. मागील एक महिन्यापासून कुरुलकर एटीएस अधिकार्‍यांना तपासात सहकार्य करीत नसल्याचे सिद्ध झाले आहे.

संशय अन् छेडछाड
कोणीतरी आपल्यावर लक्ष ठेवून असल्याचा संशय कुरुलकरला आला. आपल्याभोवती फास आवळला जाऊ नये यासाठी त्याने मोबाईलमधील डाटा क्लिअर करण्यासाठी छेडछाड केली. पुणे फॉरेन्सिक लॅबने त्या मोबाईलबाबत रिपोर्ट दिला होता की, डाटा ट्रान्सफर चालू नाही, कनेक्टिव्हिटी फेल्युर दाखवते. हे सर्व पुन्हा हस्तगत करायचे असेल तर मोबाईलची अधिकृत तज्ज्ञांकडून दुरुस्ती करून पुन्हा डाटा रिकव्हर केला जाऊ शकतो. बाहेर देण्यापेक्षा हा मोबाईल गुजरात फॉरेन्सिक लॅबकडे पाठवल्यास सर्व डाटा रिकव्हर होऊ शकतो आणि कुरुलकरचे सर्व कारनामे समोर येऊ शकतात.

कुरुलकर घेतोय ललनेची काळजी
हेरगिरीत अडकलेला कुरुलकर अजूनही त्या ललनेस वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. जप्त मोबाईलचा पासवर्ड त्याला माहीत असूनही त्याने दिलेला नाही. शिवाय ‘झारा’बद्दल मी काही बोलणार नाही, असे तपास अधिकार्‍यांना सांगून तिला बाजूला काढा, अशी विनंती तो करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

एटीएसने न्यायालयात चाचण्या करण्यासंबंधी अर्ज दाखल केला आहे. त्यासंबंधी कॉपी आम्हाला मिळाली असून, न्यायालयाने आम्हाला म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. याबाबत अशिलाशी चर्चा करून न्यायालयात आम्ही योग्य तो युक्तिवाद करणार आहोत.
                                                 – अ‍ॅड. ऋषिकेश गानू, आरोपीचे वकील

 

हे ही वाचा : 

पुणे जिल्ह्यात मतदार याद्या बारकाईने अद्ययावत करण्याचे निर्देश

पुणे : संशोधनाला बळ अन् नवसंकल्पनांचा विस्तार ; जी-20 बैठकीची सांगता

Back to top button