‘कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी ईडीची पुणे, मुंबईत छापेमारी’ | पुढारी

‘कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी ईडीची पुणे, मुंबईत छापेमारी’

पुणे : जम्बो कोविड उभारताना अनुभव नसलेल्या अनेक बोगस कंपन्या दाखवून घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्या प्रकरणाची चौकशी ईडीमार्फत सुरू होती. त्याच विषयावरून पुणे व मुंबईत छापेमारी सुरू असावी, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. पुण्यातील एका कार्यक्रमानिमित्त फडणवीस आले असता, पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.

ते म्हणाले, ईडीची छापेमारी हा राजकीय मुद्दा होऊ शकत नाही. कारण कोविड काळात उभ्या राहिलेल्या जम्बो सेंटरमध्ये मोठा घोटाळा झाल्याचे आरोप झाले होते. चौकशीअंती ईडीने कारवाई सुरू केली होती. ज्यांचा ज्यांचा या घोटाळ्यात सहभाग आहे, त्यांच्यावर ही छापेमारी असावी असे दिसते. ज्यांनी कधीच आरोग्य सेवा दिलेली नाही, त्यांच्या नावे बोगस कंपन्या दाखवून कोट्यवधी रुपये उचलले गेले. पुण्यात असाच घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले होते. इथे तर एका पत्रकाराचा मृत्यूही झाला होता. या सर्व प्रकरणाची ईडीने चौकशी करूनच छापेमारी केलेली आहे. या कारवाईत काय जप्त केले, याची माहिती ईडी देऊ शकते असेही त्यांनी सांगितले.

खबरदारी घेण्याचे आदेश
भाजप आमदार जैन यांनी अभियंत्यांना केलेली मारहाण सध्या चर्चेचा विषय बनला आहे. त्यावर फडणवीस म्हणाले, लोकप्रतिनिधींनी संयम बाळगणे गरजेचे आहे. हेही खरे आहे की, कधी कधी नेत्यांचाही तोल सुटतो अन् अशा घटना घडतात. मात्र, यापुढे असे होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

 

Back to top button