पत्नीचा खून करणार्‍या पतीला जन्मठेप ; बारामती सत्र न्यायालयाचा निर्णय | पुढारी

पत्नीचा खून करणार्‍या पतीला जन्मठेप ; बारामती सत्र न्यायालयाचा निर्णय

बारामती : पुढारी वृत्तसेवा : पत्नीचा खून करणार्‍या पतीला येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. पी. दरेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. उमेश रामचंद्र गायकवाड (वय 45, रा. टेळेवाडी फाटा, ता. दौंड) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. उमेशने पत्नी उषाच्या अंगावर डिझेल ओतून पेटवून देत हत्या केली होती. याप्रकरणी त्याच्याविरोधात यवत पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला होता. उमेशला दारूचे व्यसन होते. याला उषा विरोध करीत होती. त्यामुळे तो तिला मारहाण करीत असे.

19 मे 2012 रोजी उमेशने कॅनमधील दारू प्यायला सुरुवात केली. उषाने त्याला विरोध केला. त्याच्याकडील दारूचा ग्लास ओतून दिला. या कारणावरून त्याने पत्नीला मारहाण केली. त्यामुळे पत्नीनेही उरलेली सगळी दारू ओतून दिली. यामुळे संतप्त झालेल्या उमेशने तिच्या अंगावर डिझेल ओतत तिला पेटवून दिले. पेट घेतल्यावर तिने आरडाओरडा केला. त्यांची मुले तेथे आली. जखमी अवस्थेतील उषाला ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. तेथे तिने मृत्युपूर्व जबाब दिल्याने उमेशविरोधात गुन्हा दाखल झाला. तत्कालीन पोलिस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांनी तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

उषाचा मृ्त्युपूर्व जबाब न्यायालयात सिद्ध झाला. मुलानेही वडिलांविरोधात जबाब दिला. सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायाधीश जे. पी. दरेकर यांनी उमेशला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी पक्षाला सहायक फौजदार एन. ए. नलवडे, वेणुनाद ढोपरे यांचे सहकार्य मिळाले.

Back to top button