‘मालक आपल्या गोदामाला आग लागली ! ’ सुरक्षारक्षकाने दिली गोदामाला आगीची माहिती

‘मालक आपल्या गोदामाला आग लागली ! ’ सुरक्षारक्षकाने दिली गोदामाला आगीची माहिती

रघुनाथ कसबे :

बिबवेवाडी : गोदामातून निघत असलेला धूर आणि लागलेली आग पाहताच स्वतःचा जीव वाचवत 'मालक आपल्या गोदामाला आग लागली' म्हणत सुरक्षारक्षक असलेल्या अरविंदकुमार यांनी आरडाओरड करून कामगारांना याची माहिती दिली. डोळ्यांसमोर मालकांच्या कारखान्यातील वस्तू खाक होताना पाहून खूप दुःखही वाटले. आगीच्या ज्वाळा व धूर दिसताच मी धावत बाहेर आलो. स्वतःचा जीव  वाचवले आणि मालकाला फोन करायचा प्रयत्न केल्याचे अरविंद कुमार यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना सांगितले.

आगीची घटना कळताच क्षणी त्यांनी गोदामाकडे धाव घेतली. मात्र गोदामपर्यंत पोहचण्यापूर्वीच आगीने रौद्ररूप धारण करत सर्व गोदामातील साहित्य खाक झाले. प्रगती ऑटोमोबाईलचे मालक प्रवीण जैन घटनास्थळी आले. आगीत मोठ्या प्रमाणावर साहित्य जळून खाक झालेले पाहून त्यांनाही काही सुचेनासे झाले. अशीच अवस्था अशोक मंडप आणि डेकोरेटचे मालक अशोक शहा यांची झाली होती. मंडप डेकोरेटचे सर्व साहित्य आगीत जळून खाक झालेले पाहताच त्यांना चक्कर आली.

आनंददर्शन युवा मंचच्या कार्यकर्त्यांची मदत
काकडेवस्ती चौकातील गोदामाला लागलेली आग कळताच आनंददर्शन युवा मंचच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांनी जीवाची पर्वा न करता गोदामाकडे धाव घेतली. त्यांनी तत्काळ जमेल त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर लाखो रुपयांचे साहित्य आगीपासून दूर करून आर्थिक नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला. 'आनंददर्शन'चे विनोद दुगड आणि त्यांचे सहकारी यांचा यात सहभाग होता.

आमच्या घराच्या कोपर्‍याकडेच मोठी गोदामे आहेत. वार्‍याच्या वेगामुळे धुराचे लोट आमच्या घराकडे मोठ्या प्रमाणात येत होते. आम्ही सर्वजण घाबरून घरातून बाहेर आलो, तेव्हा मंडप साहित्य असलेले गोदाम आगीत जळून खाक झाले होते. आमच्या परिसरात दिवसभर धुरांचे लोट होते त्यामुळे घरातील लहान मुलांबाळांसह सर्वजण दिवसभर घराबाहेरच थांबलो होतो. सायंकाळी सातच्या दरम्यान आग आटोक्यात आल्यानंतर घरात गेलो.
                     – शामल कांबळे, गोदामाजवळच्या परिसरात राहणारी महिला.

आगीत 22 गोदामे जळून खाक झाली. गोदामांना आग लागल्याची घटना कळतात तातडीने आम्ही घटनास्थळी पोहचलो. आगीचे गांभीर्य ओळखून आणखी जवानांची कुमक व पाण्याच्या टँकरची मागणी केली. दिवसभर या ठिकाणी शंभर जवानांनी अतिशय शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
                                                  – देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी. 

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news