पुणे : पुढारी वृत्तसेवा : आदिवासी मूळनिवासी असताना त्यांना परकीय ठरवण्याचे कारस्थान रचले जात आहे. नक्षलवादी आणि पोलिस यांच्या दहशतीत त्यांचा वनवास चालू आहे. विकासाच्या नावाखाली त्यांच्यावर केल्या जाणार्या अन्यायामुळे त्यांची मुळे उखडली जात आहेत. सांस्कृतिक वर्चस्ववादापोटी आदिवासींची पिळवणूक होत आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. कला, साहित्य, निसर्ग आणि निसर्गप्रेमाचा आदिवासींचा वारसा जपला पाहिजे, अशी गरजही त्यांनी व्यक्त केली.
आदिवासी साहित्य आणि संस्कृती संवर्धन संस्था (बल्लारपूर, चंद्रपूर) आणि विदिशा विचार मंच, पुणे यांच्यातर्फे आयोजित पाचव्या 'आदिवासी उलगुलान वेध साहित्य संमेलना'चे उद्घाटन रविवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. क्रांतिसूर्य बिरसा मुंडा आणि आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमांचे पूजन करून संमेलनाचे उद्घाटन केले. तर, 'उलगुलान' या शब्दाचे प्रतीक असलेली मशाल आणि हाकुमी हे आदिवासी वाद्य हातात देऊन प्रा. विश्वास वसेकर यांच्याकडे संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे प्रदान केली. ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. वि. स. जोग, स्वागताध्यक्ष डॉ. संभाजी मलघे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. विनायक तुमराम, सुनील कुमरे, ममता क्षेमकल्याणी आदी उपस्थित होते.
प्रा. डॉ. तुमराम यांनी इतर सर्व धर्मीयांसाठी कायदे आहेत. मात्र, आदिवासींसाठी एकही कायदा नाही. त्यामुळे आदिवासींसाठी स्वतंत्र आदिवासी कायदा अस्तित्वात आणावा, असे सांगितले.
भारतीय संविधानाने या देशातील तळागाळातला, दर्याखोर्यांतला माणूस जागा झाला. संविधानाने या देशातल्या आदिवासी, दलित आणि भटक्या विमुक्तांना खर्या अर्थाने माणूसपण बहाल केले. मात्र, धूर्त, स्वार्थी आणि भ्रष्ट राजकीय नेत्यांनी स्वातंत्र्य त्यांच्यापर्यंत अजूनही नीट पोहचू दिले नाही.
– प्रा. विश्वास वसेकर, संमेलनाध्यक्ष.
हे ही वाचा :