पुणे : तीन कंपन्यांचे खत परवाने निलंबित ; कृषी विभागाची कारवाई | पुढारी

पुणे : तीन कंपन्यांचे खत परवाने निलंबित ; कृषी विभागाची कारवाई

पुणे : पुढारी वृत्तसेवा : 

राज्यात खरीप हंगामाच्या तोंडावर बी-बियाणे, खते, कीटकनाशकांच्या पुरवठ्याबरोबरच भेसळखोरांना अटकाव घालण्यासाठी कृषी आयुक्तालयाने निविष्ठांच्या तपासणीची धडक मोहीम राबविली आहे. त्यामध्ये कंपन्यांचे परवाने निलंबित, तर काहींचे रद्द करण्याची कारवाई केल्याची माहिती कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) विकास पाटील यांनी दिली. पुण्यातील मे. कस्तुरी अ‍ॅग्रो फर्टिलायझर्स, मे. सेवा टेक्नो इंटरनॅशनल प्रा. लि., मे. गीताजी पेस्टीसाईड इंडस्ट्रीज या तीन कंपन्यांच्या खतांचे नमुने मोठ्या फरकाने अप्रमाणित आढळून आल्याने त्यांचे परवाने निलंबित केले. मे. सत्यम बायोटेक या कंपनीने अप्रमाणित व अत्यंत निकृष्ट दर्जाच्या कीटकनाशकांचे उत्पादन व विक्री केल्याने कंपनीचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे.

नाशिक येथील गोल्डन अपॉरच्युनिटी कंपनीविरोधात प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने देण्यात आलेला जैवउत्तेजक उत्पादके फॉर्म जी-2 कायमस्वरूपी रद्दकेला आहे. या शिवाय केपीआर कंपनीचे नमुने काढण्याची विशेष मोहीम राबवून 7 जिल्ह्यांमध्ये काढलेल्या 69 नमुन्यांपैकी 43 नमुने अप्रमाणित आल्याने संबंधित कंपनीचा विक्री परवाना निलंबित केला आहे. नांदेड येथील श्री महाराष्ट्र फर्टिलायझर अ‍ॅण्ड केमिकल्स या कंपनीबद्दल औरंगाबाद येथील दाणेदार मिश्र खत उत्पादक असोसिएशनकडील प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने कंपनीचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.

चार कंपन्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस
केंद्र सरकारच्या तपासणी पथकासोबत विशेष मोहिमेदरम्यान राज्यातील कृषी निरीक्षकांसह सिंगल सुपर फॉस्फेट (एसएसपी) व दाणेदार मिश्र खत उत्पादकांची तपासणी करून नमुने काढण्यात आलेले आहेत. तसेच जादा दराने कापसाच्या बियाण्यांची विक्री केल्याच्या संदर्भात चार कंपन्यांना परवाने निलंबित का करण्यात येऊ नये याबाबत ’कारणे दाखवा’ नोटीस देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

प्राण्यांमध्ये अधिक रमणारी ब्युटी क्वीन

अहमदनगर : इमामपूरजवळ अपघातात कंटेनरचालकाचा मृत्यू

 

Back to top button