

परिंचे : पुढारी वृत्तसेवा : श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे शनिवारी (दि. 17) ज्येष्ठ दर्श अमावास्येनिमित्त श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. त्यातच शनी अमावास्या व शनैश्वरांचे आराध्य काळभैरवनाथ असल्याने शनी महाराजांची कृपादृष्टी राहावी म्हणून अनेकांनी श्रीनाथांना साकडे घातले. जून महिना संपत आला तरीही अजून वरुणराजा बळीराजावर कोपलेला आहे. अनेकांनी लवकरच पाऊस पडावा, अशी श्रीनाथांना याचना केली. जिल्ह्यासहित इतर जिल्ह्यांतूनही भाविक श्रीनाथांच्या दर्शनासाठी आले होते. त्यामुळे वीर आणि परिसर भक्तिमय झाला होता.
अनेक भाविक वीर येथे पायी वारी करीत असतात. त्याच अनुषंगाने कोडीत येथून अनेक भाविक वीर येथे पायी दर्शनासाठी आले होते. अमावास्या असल्याने मंदिरात सकाळपासूनच भाविकांची गर्दी होती. पहाटे 4.30 वाजता पूजा होऊन मुख्य गाभारा बंद केला. सकाळी 6 वाजता गाभारा दर्शनासाठी खुला केला. सकाळपासून देवस्थान ट्रस्ट व भाविकांतर्फे देवाला अभिषेक झाले. सकाळी 10 वाजता देवाला भाविकांच्या दही-भाताच्या पूजा बांधण्यात आल्या. देऊळवाड्यात दगडी कासवावर सालकरी गोसावी मंडळींचा पारंपरिक गोंधळाचा कार्यक्रम दिवसभर सुरू होता.
भक्तांसाठी महाप्रसाद आयोजित केला होता. आलेल्या सर्व भक्तांसाठी ट्रस्टमार्फत सर्व सुविधा पुरविल्या असून, ट्रस्टमार्फत मंदिराच्या आतील व बाहेरील अनेक कामे पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी सांगितले. देवस्थान ट्रस्टमार्फत भाविकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, लाइट व जनरेटर, दर्शनबारी, सॅनिटायझर, तीन ठिकाणी वाहनतळ व्यवस्था इत्यादीचे आयोजन केले होते. या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, सर्व विश्वस्त मंडळ, सल्लगार मंडळ, ट्रस्टचे कर्मचारी आदींनी व्यवस्था केली.