पुणे : ‘खडकवासला’त 15 .94 टक्के पाणीसाठा | पुढारी

पुणे : ‘खडकवासला’त 15 .94 टक्के पाणीसाठा

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : पुणे शहर व जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांच्या परिसरात अजून पावसाला सुरुवात झाली नाही. धरण साखळीत सद्यस्थितीत (शनिवार सायंकाळपर्यंत) 4.65 टीएमसी (15.94 टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. दरम्यान, खडकवासला धरणातून शेतीचे पाणी बंद करण्यात आले. गतवर्षीच्या तुलनेत धरण साखळीत एक टीएमसी जादा पाणी आहे.

मात्र, अवकाळी पावसाचा अपवाद वगळता गेल्या 7 जूनपासून धरणसाखळीत अद्याप जोरदार पाऊस झाला नाही. त्यामुळे धरणसाठ्यात भर पडली नाही. शेतीचे पाणी बंद करण्यात आले असले, तरी पिण्यासाठी पाणी सोडले जात असल्याने पाणीसाठ्यात घट सुरू आहे. वरसगाव धरणातून 575 क्सुसेक्स वेगाने खडकवासला धरणात सोडले जात आहे.
खडकवासला धरणात सध्या 43.34 टक्के, पानशेतमध्ये 12.59 टक्के, वरसगावमध्ये 18.16 टक्के शिल्लक असून, टेमघर धरण जवळपास कोरडे आहे.

शेतीचे आवर्तन शुक्रवारी (दि.16) सकाळपासून टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आले असून, शनिवारी मुठा कालव्यातील विसर्ग बंद करण्यात आला. धरण साखळीत ऑगस्टपर्यंत पिण्यासाठी पुरेसे एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.
            – मोहन बदाणे, उपविभागीय अधिकारी, खडकवासला जलसंपदा विभाग

Back to top button