पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीची लांबी वाढविण्यात येणार असल्याने लोहगावला जाणारा रस्ता नेमका कुठून करायचा? याबाबतचा पर्याय पुढील आठवड्यात निश्चित करण्यात येणार आहे. त्या पर्यायाला संरक्षण विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर जुलैमध्ये नवीन रस्त्याचे काम सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
लोहगाव येथील विमानतळ हवाई दलाच्या जागेत असून, सध्या येथून देशांतर्गत सेवेसह बँकॉकसह काही आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणेही होतात. मात्र, आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांसाठी आवश्यक असणारी धावपट्टी नाही. कमी लांबीची धावपट्टी असल्याने आंतरराष्ट्रीय विमानसेवेला गती मिळत नव्हती.
नोव्हेंबर महिन्यामध्ये केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी धावपट्टी वाढविण्याबाबत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीची लांबी दक्षिण बाजूस वाढविण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. मात्र, या धावपट्टीची लांबी वाढविण्यात वेकफिल्ड चौकाकडून लोहगावकडे जाणार्या रस्त्याचा अडसर निर्माण होतो. त्यामुळे या रस्त्याचे स्थलांतर करावे लागणार आहे.
या पार्श्वभूमीवर विमानतळ प्रशासन आणि महापालिका अधिकार्यांच्या बैठका आणि पाहणीही झाली आहे. यासंदर्भात शुक्रवारी महापालिकेच्या अधिकार्यांनी सर्व्हे केला असून, नवीन रस्ता करण्यासंदर्भात विविध पर्यायांचा विचार केला जात आहे. विविध तीन पर्यायांपैकी एक पर्याय पुढील आठवड्यात निश्चित केला जाणार आहे. त्याचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाला पाठवून मंजुरी घेतली जाणार आहे. त्यानंतर जुलैमध्ये नवीन रस्त्याचे काम सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे. नवीन रस्ता सुरू झाल्यानंतर सध्याचा रस्ता बंद करून धावपट्टीची लांबी वाढविण्याचे काम सुरू केले जाणार आहे. दरम्यान, नवीन रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी उंच भिंत बांधण्यात येणार आहे.
हा पर्याय निश्चित होण्याची शक्यता
नवीन रस्ता करण्यासंदर्भात तीन पर्यायांचा विचार केला जात आहे. यामध्ये फाइव्ह नाइन चौक ते गॅरिसन इंजिनिअर्स ऑफिस जागेतून पुढे बर्माशेल झोपड़पट्टीच्या बाजूने हवाईदलाच्या जागेला वळसा घालून दगडखाणीपासून पुढे कलवडवस्तीला अस्तित्वातील रस्त्याला जोडणे, वेकफिल्ड चौक ते केंद्रीय विद्यालय व राडार ऑफिसच्या मधून रस्ता तयार करणे आणि एलिव्हेटेड रस्ता विकसित करणे, असा पर्यायांचा समावेश आहे. मात्र, यापैकी पहिला पर्याय जो फाइव्ह नाइन चौक ते गॅरिसन इंजिनिअर्स ऑफिस जागेतून पुढे बर्माशेल झोपड़पट्टीच्या बाजूने हवाईदलाच्या जागेला वळसा घालून दगडखाणीपासून पुढे कलवडवस्तीला अस्तित्वातील रस्त्याला जोडणे हा पर्याय निश्चित होण्याची शक्यता जास्त आहे.