पुणे : बीट मार्शलनेच नियंत्रण कक्षाला केला खोटा कॉल ; रस्ते ठेकेदाराला धरले वेठीस | पुढारी

पुणे : बीट मार्शलनेच नियंत्रण कक्षाला केला खोटा कॉल ; रस्ते ठेकेदाराला धरले वेठीस

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पोलिस नियंत्रण कक्षाला स्वत: खोटा कॉल करून रस्त्याचे काम करणार्‍या ठेकेदाराला वेठीस धरून नाहक त्रास देणार्‍या डेक्कन पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचार्‍यांचे (बीट मार्शल) पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांनी तडकाफडकी निलंबन केले आहे. पोलिस शिपाई निखिल राजेंद्र शेडगे आणि आकीब सत्तार शेख, अशी दोघांची नावे आहेत. बेजबाबदार वर्तन करून पोलिस दलाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवत दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.

दोघे निलंबित पोलिस कर्मचारी 12 मे रोजी प्रभात पोलिस चौकीच्या हद्दीत बीट मार्शल म्हणून रात्रपाळीवर होते. एका ठेकेदाराचे प्रभात रस्त्यावरच रस्तादुरुस्तीचे काम होते. रात्री सव्वा वाजता दोघे एका हॉटेलवर गेले. तेथील कामगाराचा मोबाईल घेऊन त्यांनी नियंत्रण कक्षाला कॉल केला. मोबाईल बंद करून त्यांनी तो परत कामगाराकडे दिला. त्यानंतर दोघे सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी गेले.
नंतर ठेकेदाराला नियंत्रण कक्षाचा कॉल आला. तुमच्या कामाची वर्क ऑर्डर आणि रात्री काम करण्याची परवानगी दाखवा, नाहीतर काम बंद करा, असे त्याला सांगण्यात आले.

ठेकेदाराने वर्क ऑर्डर दाखवून रस्त्यावर खडी पडली आहे, ती काढावी लागेल; अन्यथा गाड्या स्लीप होतील, असे सांगितले.
तरीदेखील त्यांनी ठेकेदाराला पोलिस ठाण्यात नेले. त्यामुळे त्याला नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागले.

बनाव असा झाला उघड
हा प्रकार घडल्यानंतर ठेकेदाराने वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. त्यानुसार नियंत्रण कक्षाला आलेल्या फोन कॉलची चौकशी करण्यात आली. त्या वेळी तो एका हॉटेल कामगाराच्या नावावर असल्याचे समोर आले. त्याने दिलेल्या जबाबात त्याचा मोबाईल पोलिस कर्मचारी शेडगे आणि शेख यांनी फोन करण्यासाठी घेतल्याचे सांगितले. त्याच्या हॉटेलमालकादेखील या दोघांनी फोन करण्यासाठी मोबाईल घेतल्याचेच सांगितले. त्या वेळी दोघा पोलिसांनी दुसर्‍याचा मोबाईल वापरून नियंत्रण कक्षाला स्वतःच खोटा कॉल देऊन ठेकेदाराला विनाकारण मनस्ताप होईल असे वर्तन केले. त्यामुळे दोघांना निलंबित करण्यात आले आहे.

Back to top button