

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पीएमपीचे चालक आता पीएमपी प्रशासनासाठी डोकेदुखी बनत आहेत. रोज कुठे ना कुठे, काही ना काही त्यांचे उद्योग सुरूच असतात. वाहतूक नियमांचा भंग करतील, कधी सिग्नल तोडतील, कधी वाहतुकीला अडथळा ठरेल अशी बस पार्क करतील, तर कधी राँग साइडने बस चालवतील, प्रवाशांशी वाद घालतील, हे ठरलेलेच. अशीच एक घटना शुक्रवारी पुण्यात घडली. यात पीएमपी चालक पठ्ठ्याने चक्क फुटपाथवरच (पादचारी मार्ग) बस चढवली.
पीएमपीच्या एका चालकाने शुक्रवारी आपली बस सेव्हन लव्हज (कृष्णराव चिमणराव ढोले) चौकातील पादचारी मार्गावरच चढवली. त्यामुळे पादचार्यांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागली. हडपसरच्या दिशेने जाणार्या या बसचा एमएच 12 एचबी 0047 असा क्रमांक होता. ऋषिकेश हिरडे या सजग पुणेकराने पीएमपीकडे यासंदर्भात तक्रार केली आहे. पीएमपीनेही तक्रार घेतली असून, टी 1146 असा त्याचा तक्रार क्रमांक आहे. मात्र, त्यावर पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया काय कारवाई करणार हे पाहावे लागणार आहे.
हे ही वाचा :