पुणे महापालिकेत समाविष्ट गावांत होणार आठ एसटीपी प्रकल्प ; आराखडा तयार | पुढारी

पुणे महापालिकेत समाविष्ट गावांत होणार आठ एसटीपी प्रकल्प ; आराखडा तयार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांमध्ये 8 ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) उभारण्यात येणार असून, याचा प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पांची क्षमता 2054 पर्यंतची संभाव्य लोकसंख्या विचारात घेऊन निश्चित करण्यात आली आहे. तसेच महापालिकेच्या जुन्या 6 एसटीपी प्रकल्पांचेही नूतनीकरण करण्यात येणार आहे.
महापालिकेत समाविष्ट झालेल्या 11 गावांसाठी दोन मएसपीटीफ प्रकल्प बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांसाठी आठ मएसटीपीफ प्रकल्प बांधण्याचा डीपीआर तयार करण्यात आला आहे. या 23 गावांमध्ये मैलापाणी संकलित करण्यासाठी आणि त्यावर प्रक्रिया करण्याची कोणतीही व्यवस्था यापूर्वी करण्यात आलेली नाही.

त्यामुळे गावांमध्ये 306 चौरस किलोमीटरच्या परिसरात 204 किलोमीटरच्या ड्रेनेज लाइन टाकण्यासोबतच 15 हजार चेंबर्स तयार करण्यात येणार आहेत. हे प्रकल्प 2054 पर्यंतची संभाव्य लोकसंख्या गृहीत धरून तयार करण्यात येत असून, त्यासाठी सुमारे 1400 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. राज्य सरकारने पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनशी (आयएफसी) काही करार केले आहेत. या करारांच्या आधारे या प्रकल्पास निधी उपलब्ध करण्यासाठी आयएफसी प्राथमिक चर्चा करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. त्यांना आराखडा सादर केला आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आल्यानंतर महापालिकेकडून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. हा निधी उपलब्ध झाल्यास 2026 पर्यंत काम पूर्ण होईल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे.

जायका कंपनीच्या सहकार्याने सुरू असलेल्या नदी सुधार योजनेंतर्गत 11 एसटीपी प्रकल्पांचे काम सुरू आहे. जुन्या 10 एसटीपींपैकी भैरोबा नाला, नायडू हॉस्पिटल येथील प्रकल्पासह तीन प्रकल्प पाडून नवीन बांधण्याचे नियोजन करण्यात येत आहे. तसेच 6 प्रकल्पांचे नूतनीकरण करावे लागणार आहे. यासाठी 850 कोटी रुपये खर्च आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येकी 25 टक्के हिस्सा देणार असून, उर्वरित खर्च महापालिकेला करावा लागणार आहे.
                                                     – विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका.

 

Back to top button