दोन महिन्यांत साडेतीन हजार बस रस्त्यातच बंद ! | पुढारी

दोन महिन्यांत साडेतीन हजार बस रस्त्यातच बंद !

पुणे : पीएमपीच्या ताफ्यात असलेल्या ठेकेदारांच्या बस अनेक दिवसांपासून रस्त्यातच बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन महिन्यांत पीएमपीच्या साडेतीन हजार बस रस्त्यात बंद पडल्या. त्यातील 2 हजार 154 बस ठेकेदारांच्या होत्या. तर 1 हजार 359 बस स्वमालकीच्या होत्या. यावरून ठेकेदारांच्या बस बंद पडण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसत असून, गाड्यांच्या देखभाल-दुरुस्तीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पूर्वी पीएमपीच्या दिवसाला 100 बस ब्रेकडाऊन आणि रस्त्यातच या गाड्यांना आग लागण्याची घटना घडत होती. त्या वेळी असलेल्या तत्कालीन अध्यक्षा नयना गुंडे यांनी उपाययोजना करत समित्यांची स्थापना केली होती.

त्या वेळी त्यांनी ताफ्यात फेम योजनेंतर्गत नव्या इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यास सुरुवात केली. त्या वेळी काही प्रमाणात ब्रेकडाऊन घटले. त्यानंतर पीएमपीच्या ताफ्यात नव्या इलेक्ट्रिक बस येण्यास सुरुवात झाली. आता पीएमपीकडे सुमारे 400 ते 500 ई-बस आहेत. तर आणखी ई-बस ताफ्यात आणण्याचे नियोजन असून, इतर सर्व सीएनजी आणि डिझेलवरील बस आहेत. परंतु, मागे असेच बसचे ब्रेकडाऊन वाढल्यामुळे तत्कालीन अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ताफ्यातून डिझेलवरील जुन्या आयुर्मान संपलेल्या गाड्या काढण्यास सुरुवात केली. त्या वेळी काही प्रमाणात ब्रेकडाऊन घटले. मात्र, आता पुन्हा ब्रेकडाऊन बसच्या संख्येत वाढ होत असून, यामध्ये ठेकेदारांकडील गाड्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे त्यांची वेळेत देखभाल-दुरुस्ती होते की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया याबाबत काय कार्यवाही करणार, ते पहावे लागणार आहे.

रस्त्यातच गाड्या बंद पडल्याने प्रवाशांना मनस्ताप
पीएमपीच्या पुणे व परिसरात दररोज 1600 ते 1700 बस मार्गावर धावत असतात. त्याद्वारे दररोज 10 ते 11 लाख प्रवासी प्रवास करतात. सकाळी आणि सायंकाळी पीएमपीच्या गाड्यांना अगोदरच गाड्या कमी असल्यामुळे प्रचंड गर्दी असते. त्यातच अशा प्रकारे गाड्या रस्त्यातच बंद पडल्यामुळे चाकरमान्यांना वेळेत कार्यालयात पोहोचता येत नाही. रस्त्यात उभे राहून दुसर्‍या गाडीसाठी प्रतीक्षा करावी लागते. परिणामी, त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पीएमपीच्या दोन महिन्यांत बंद पडलेल्या बस
एप्रिलमध्ये 1614
मेमध्ये -1899
एकूण – 3513
अशा झाल्या बस ब्रेकडाऊन
ठेकेदारांच्या – 2 हजार 154 बस
स्व:मालकीच्या – 1 हजार 359 बस

पीएमपीला सेवा पुरविणारे ठेकेदार
ओलेक्ट्रा ग्रिनटेक
ई.व्ही.ट्रान्स प्रा.लि.
ओव्हा कम्युट प्रा.लि.
ट्रॅव्हल टाईम मोबिलिटी इंडिया प्रा. लि.
बीव्हीजी इंडिया प्रा.लि.
अ‍ॅन्टोनी गॅरेज प्रा.लि.
हंसा वहन प्रा.लि.
विश्वयोध्दा शेतकरी मल्टिट्रेड प्रा.लि.

 

हे ही वाचा : 

आता मोबाईल फोन करणार त्वचेच्या कर्करोगाचे निदान

सावरकरांचा धडा वगळण्यास लोकांची मान्यता : कर्नाटक सरकारच्या निर्णयावर शरद पवारांचे विधान

Back to top button