हॉटेल, मॉलच्या पार्किंगची पुणे पालिका करणार तपासणी | पुढारी

हॉटेल, मॉलच्या पार्किंगची पुणे पालिका करणार तपासणी

पुणे : हॉटेल किंवा मॉलमध्ये येणारे नागरिक आपली वाहने रस्त्याच्या कडेला पार्क करतात. या वाहनांचा अडथळा होऊन वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महापालिका शहरातील हॉटेल आणि मॉलच्या पार्किंगची तपासणी करणार आहे. या पाहणीमध्ये पार्किंगचा वापर इतर कारणांसाठी होत असल्याचे आढळल्यास बांधकाम विभाग आणि अतिक्रमण विभागाकडून संयुक्त कारवाई केली जाणार आहे.

हॉटेल किंवा मॉलच्या बांधकामास परवानगी देताना येणार्‍या ग्राहकांच्या वाहनांची पार्किंग सुविधा करणे बंधनकारक करण्यात येते. मात्र, अनेक हॉटेल मालक पार्किंगच्या जागेचा वापर इतर कारणांसाठी करतात, तसेच मॉलच्या पार्किंगमध्ये अनेक वेळा साहित्य ठेवले जाते, शिवाय पार्किंगसाठी अवाच्या सव्वा शुल्क आकारले जाते. त्यामुळे हॉटेल व मॉलमध्ये येणारे ग्राहक रस्त्याच्या कडेला आपली वाहने उभी करतात. परिणामी, रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होऊन वाहतूक कोंडी होते.

शिवाजीनगरमधील आपटे रस्त्यावर मोठमोठी अनेक हॉटेल्स आहेत. या हॉटेलमध्ये येणारे ग्राहक रस्त्याच्या कडेलाच आपली वाहने पार्क करतात. हॉटेलच्या बाहेर उभे असणारे सुरक्षारक्षक ग्राहकांची वाहने इमारतीच्या पार्किंगमध्ये न जाऊ देता, रस्त्याच्या कडेला उभी करण्यास सांगतात. यामुळे आपटे रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होते. अशीच परिस्थिती शहरातील विविध रस्त्यांवर असलेल्या हॉटेल आणि मॉलच्या परिसरात दिसते. याबाबत महापालिका प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर अतिक्रमण विभाग आणि बांधकाम विभाग एकमेकांकडे बोट करून जबाबदारी झटकून लावतात.

इमारतीच्या पार्किंगमधील अतिक्रमण काढण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची आहे. तर रस्त्यावर होणार्‍या अतिक्रमणांवर कारवाई करण्याची जबाबदारी अतिक्रमण विभागाची आहे. त्यामुळे या दोन विभागांच्या वतीने संयुक्तपणे पाहणी करून कारवाई करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.

हॉटेल आणि मॉलमध्ये येणार्‍या ग्राहकांची वाहने आपापल्या प्रिमायसेसमध्ये पार्किंग करणे बंधनकारक आहे. मात्र, ही वाहने रस्त्याच्या कडेला पार्किंग केली जात असल्याने वाहतूक कोंडी होते. त्यामुळे इमारतीच्या पार्किंगचा वापर कोणत्या कारणासाठी केला जातो. पार्किंगसाठी व्यवस्था काय केली आहे, याची तपासणी केली जाणार आहे. पार्किंगच्या जागेचा गैरवापर होत असल्यास किंवा पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्यास बांधकाम व अतिक्रमण विभागांकडून संयुक्तपणे कारवाई केली जाणार आहे.
                                   – विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

हे ही वाचा : 

थैमान बिपरजॉय चक्रीवादळाचे

इस्लाम कबूल कर, नाहीतर गोळ्या घालीन! अल्पवयीन मुलीला धमकी

Back to top button