Ashadhi wari 2023 : तुकोबारायांचे वरवंडला दिमाखात स्वागत | पुढारी

Ashadhi wari 2023 : तुकोबारायांचे वरवंडला दिमाखात स्वागत

रामदास डोंबे : 

खोर (पुणे )  : पुढारी वृत्तसेवा
माझ्या जीवीची आवडी ।
पंढरपुरा नेईन गुढी
पांडुरंगी मन रंगले
गोविंदाचे गुण वेधीले

‘ज्ञानोबा माउली तुकाराम’च्या जयघोषात… टाळ-मृदंगांच्या गजरात… ऊन-सावलीचा खेळ झेळत श्री संतश्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा वरवंड (ता. दौंड) येथे शुक्रवारी (दि. 16 ) मुक्कामी विसावला. फटाक्यांच्या आताषबाजीत पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. पालखी सोहळा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आल्यावर सरपंच मीनाक्षी दिवेकर व उपसरपंच बाळासाहेब जगताप यांच्या हस्ते पादुकापूजन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक आरती झाली. या वेळी सर्व वारकरी दिंड्या या वरवंड गावातील घरोघरी पूजन होऊन जेवणासाठी मार्गस्थ झाल्या.

पालखी सोहळा सायंकाळच्या सुमारास वरवंड येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये मार्गस्थ झाला. या वेळी वरवंड गावच्या वेशीवर पालखी सोहळा आल्यावर वरवंडच्या सरपंच मीनाक्षी दिवेकर, उपसरपंच बाळासाहेब जगताप आणि ग्रामस्थांच्या वतीने वरवंड चौकात पालखी सोहळ्याचे आगमन झाल्यावर पुष्पवृष्टी करीत स्वागत करण्यात आले. वरवंड गावच्या वतीने पालखी सोहळ्याच्या मुक्कामी दिवशी वारकरीवर्गाला वरवंड ग्रामस्थांच्या वतीने 3 क्विंटल लापशी, 3 क्विंटल भात व 8 पातेली आमटीचे नियोजन जेवणासाठी करण्यात
आले; तर रामदासनाना मित्रमंडळाच्या वतीने वारकर्‍यांना झुणका-भाकरीचे जेवण देण्यात आले. वरवंड येथील शुभकार्य व्यवसाय संघातर्फे चहा व पोह्याची सोय करण्यात आली होती. वरवंड परिसरातील भाविकभक्तांनी पालखीच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या. या वेळी वरवंड गावाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

हे ही वाचा : 

गळतीच्या नावावर दूधगंगेतील पाणी कर्नाटकात सोडले : आमदार हसन मुश्रीफ

दहावी पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

Back to top button