Ashadhi wari 2023 : महर्षी वाल्मीकी ऋषींच्या दोन पालखी सोहळ्यांचे होणार प्रस्थान | पुढारी

Ashadhi wari 2023 : महर्षी वाल्मीकी ऋषींच्या दोन पालखी सोहळ्यांचे होणार प्रस्थान

वाल्हे : पुढारी वृत्तसेवा :  आद्य कवी ‘रामायण’कार महर्षी वाल्मीकी ऋषींचा पालखी सोहळा सालाबादप्रमाणे यंदाही विठुरायाच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र पंढरपूरला जाणार आहे. वाल्हे (ता. पुरंदर) येथील महर्षी वाल्मीकी ऋषींचे दोन पालखी सोहळे निघतात. एक पालखी सोहळा ह.भ.प. माणिक महाराज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पाठीमागे जात असतो. त्यांचा पहिला मुक्काम लोणंद येथे असतो. दुसरा पालखी सोहळा ह.भ.प. अशोक महाराज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निघतो. या पालखी सोहळ्याचे प्रस्थान येत्या रविवारी (दि. 18) वाल्हे येथील महर्षी वाल्मीकींच्या संजीवन समाधी मंदिरातून होणार असल्याची माहिती पालखी सोहळ्याचे संस्थापक ह.भ.प. अशोक महाराज पवार, ह.भ.प. माणिक महाराज पवार यांनी दिली.

या वेळी माउलींचा पालखी सोहळा येत्या शनिवारी (दि. 17) वाल्हेनगरीत मुक्कामी विसावणार आहे, तर दुसर्‍या दिवशी पहाटे माउलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाल्यानंतर साधारण सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान महर्षी वाल्मीकी ऋषींच्या पालखी सोहळ्याचे देखील प्रस्थान होणार आहे. या पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम रविवारी (दि. 18) सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे होणार आहे. त्यानंतर सोमवारी (दि. 19) साखरवाडी, मंगळवारी (दि. 20) सांगवी, बुधवारी (दि. 21) मठाचीवाडी, गुरुवारी (दि. 22) शिंदेवाडी, शुक्रवारी (दि. 23) फोंडशिरस, शनिवारी (दि. 24) मेडद, रविवारी (दि. 25) अकलूज, सोमवारी (दि. 26) मळखांबी, तर मंगळवारी (दि. 27) भंडी शेगाव येथे पालखीचा मुक्काम होणार आहे.

बुधवारी (दि. 28) भंडी शेगावहून वाखरी येथे दुपारचा विसावा घेऊन पालखी सोहळा माउलींच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये मुक्कामी दाखल होणार आहे. गुरुवारी (दि. 29) देखील पालखी मुक्कामीच असल्याने शुक्रवारी (दि. 30) या पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासात शेवटचा मुक्काम थेट वाल्हेतील कामठवाडी येथे होणार आहे. शनिवारी (दि. 1 जुलै) महर्षी वाल्मीकी ऋषींच्या समाधी मंदिरात या सोहळ्याची सांगता होणार असल्याची माहिती पालखी सोहळ्याचे चोपदार लक्ष्मण बुनगे यांनी दिली.

Back to top button